नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराची भीती

नक्षलवाद्यांनी गेल्या दहा दिवसांपासून सुरू केलेल्या हिंसाचारात सातजणांचे बळी गेल्याने धास्तावलेल्या लॉयड मेटल्सने सूरजागड येथील लोह उत्खनन तातडीने बंद केले आहे. सूरजागड प्रकल्पामुळेच नक्षलवादाला बळ मिळाले व त्यामुळेच गावा गावांत ग्रामसभांनी बैठका घेऊन या प्रकल्पाला विरोध केल्यानेच सध्यातरी सूरजागड येथील उत्खनन बंद करावे लागले आहे.

सूरजागड येथे लोह उत्खननाला सुरुवात झाली, त्या दिवसापासून गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हिंसाचार वाढला ही वस्तुस्थिती आहे. गेल्या वर्षी २३ डिसेंबरला नक्षलवाद्यांनी सूरजागड पहाडावर लॉयड मेटल्सचे ८५ ट्रक जाळले होते. त्यापूर्वी लॉयडच्या व्यवस्थापकासह तिघांना नक्षलवाद्यांनी ठार केले होते. सूरजागड हा प्रकल्प एटापल्ली तालुक्यात येतो. त्यामुळे एटापल्ली तालुक्यात सामान्य आदिवासी व दलितांचे हत्यासत्रच नक्षलवाद्यांनी लोकांमध्ये भीती व दहशत निर्माण करण्यासाठी सुरू केले. त्यानंतरही सूरजागड प्रकल्प सुरूच राहिला.

दरम्यान, या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ एकत्र आले. गावा गावात ग्रामसभांच्या सभा वाढल्या आणि सूरजागड प्रकल्पाला तीव्र विरोध सुरू झाला. अशाही स्थितीत केंद्र व राज्य सरकारने अतिरिक्त पोलिस बळावर हा प्रकल्प सुरू केला. तसेच पोलिसांनी नक्षलवाद्यांची जंगलातच नाकेबंदी केली. त्यामुळे वर वर बघता शांतता दिसत होती. मात्र, नक्षलवादी शांत झाले, असा गवगवा करण्यात पोलिस अधिकारी मग्न असतानाच पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डोके वर काढत हिंसाचाराला सुरुवात करून दहा दिवसात सात लोकांचे बळी घेतले. परिणामी पुन्हा एकदा भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून सामान्य आदिवासी व दलितांच्या हत्यांचे सत्र नक्षलवाद्यांनी सुरू केल्याने धास्तावलेल्या लॉयड व्यवस्थापनाने गुरुवारपासून सूरजागड येथील लोह उत्खनन व वाहतूक बंद केली आहे. सध्या ही वाहतूक बंद असली तरी येत्या काळात ती पुन्हा सूरू होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, नक्षलवादी हिंसाचार बघता सध्या तरी सूरजागड प्रकल्प पूर्णत: बंद आहे. याला नक्षलवाद्यांचा हिंसाचार आणि सातजणांचे बळी व पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा स्थापना दिवस ही तीन प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे. पीपल्स गुरिल्ला आर्मीचा स्थापना दिवस २ ते ८ डिसेंबर या कालावधीत हिंसाचार करून साजरा करण्याचे आवाहन नक्षली संघटनांनी केले आहे.

नक्षलवाद्यांचे फलक

या हिंसाचारात पुन्हा एकदा सूरजागड पहाडावर ट्रकची जाळपोळ, हत्यासत्र सुरू होईल, या भीतीनेच लोह उत्खनन बंद केले आहे. हिंसाचार थांबल्यानंतर पुन्हा हे उत्खनन सुरू होईल असे सांगितले जात आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्हय़ात फलक लावून सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणे हे गुलामगिरीपेक्षा कमी नाही, तेव्हा पोलिसांची शस्त्रे हिसकावून त्यांचा सफाया करा, असे आवाहन भाकप माओवादी संघटनांनी केले आहे.