मराठा आरक्षणच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. विनायक मेटे मराठा व ओबीसी समाजात भांडणे लावून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबादमधील घटना हा केवळ मेटे यांना इशारा होता, त्यांनी हे उद्योग थांबवले नाही व पुन्हा मराठा आरक्षण जागर परिषद घेतल्यास मेटे यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा छावा युवा संघटना, ओबीसी सेवा संघ, बारा बलुतेदार सेवा संघ, अखिल भारतीय छावा संघटना यांनी दिला आहे. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय सावंत, ओबीसी संघाचे अशोक सोनवणे यांनी हा इशारा दिला. मराठा आरक्षण चळवळीच्या पाठीत मेटे यांनी खंजीर खुपसला आहे, त्यांनी प्रथम राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन आरक्षण मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे, केवळ आमदारकी टिकवण्यासाठीच ते चळवळीचा वापर करत आहेत, विधानपरिषदेवरील त्यांची मुदत संपल्यानेच राष्ट्रवादीला उपद्रव मुल्य दाखवून देण्यासाठीच त्यांच्यातील मराठा अस्मिता जागृत झालेली आहे, आरक्षणाच्या मुद्यावर सर्व मराठा समजाच्या २२ संघटना शाहु महाराजांचे वंशज संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या असताना मेटे समाजाची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप सावंत यांनी केला. मेटे यांच्या जागर परिषदेत केवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी आहेत, ओबीसी व मराठा यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचा मेटे व भुजबळ यांचा प्रयत्न आहे, असा आरोप संघाचे सोनवणे यांनी केला.