भारतीय हवामानखात्याकडून येत्या ४८ तासांत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबई, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरूवारी गणपती विसर्जनालाही राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली होती. मुंबई-उपनगरात गुरूवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती.  शहरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३९.८४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर पश्चिम उपनगरांत ३७.९३ मिमी पाऊस झाला असून पूर्व उपनगरात ३६.३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय, ठाणे, पुणे , नाशिक आणि औरंगाबादमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली होती. हवामान खात्याच्या नव्या इशाऱ्यानुसार कोकण-गोवा पट्ट्यात येत्या २४ तासांत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच १९ सप्टेंबर रोजी राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस तर मध्य महाराष्ट्रात १७,१८ आणि १९ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. मराठवाडा आणि विदर्भात येत्या २४ तासांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.