देशभरामध्ये सध्या ‘मी टू’ या मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. # MeToo मोहिमेच्या माध्यमातून अनेक महिला व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेक जण याविषयी आता उघडपणे त्यांचं मत मांडत आहेत. यामध्येच आता अभिनेता आयुषमान खुरानाने त्याचं मत व्यक्त केलं आहे.

‘सध्या जोरदार चर्चा होत असलेलं ‘मी टू’ हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी बोलत आहेत. परंतु आपण केवळ आरोप करणाऱ्या व्यक्तीचीच बाजू ऐकून न घेता आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीचीही बाजू ऐकून घेणं तेवढंच गरजेचं आहे. जर दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्या तर सत्य परिस्थिती काय आहे हे समोर येईल. परंतु केवळ एकाच व्यक्तीचं ऐकून आपण दुसऱ्या व्यक्तीला दोषी ठरवू शकत नाही’, असं आयुषमान म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘कार्यालयाच्या ठिकाणी काही नियम सक्तीचे करणे गरजेचे आहे. खरंतर कार्यालयच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे’.

वाचा :

दरम्यान, ‘मी टू’ वर भाष्य करणाऱ्या आयुषमानचा ‘बधाई हो’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने काही कालावधीच लोकप्रियता मिळविली आहे. विशेष म्हणजे आयुषमानच्या करिअरमधील पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.