विविध मागण्यांसाठी एम.फुक्टो.ने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एम.फुक्टो.चे सचिव डॉ. प्रवीण रघुवंशी दिली आहे.
नेट-सेटग्रस्त प्राध्यापकांच्या संदर्भात, सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या कुंठीत वेतनवाढीच्या वसूल केलेल्या रकमा परत करण्याच्या व ग्रॅच्युईटीच्या संदर्भात अनेक निर्णय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिले असतांनाही शिक्षण खात्याने त्याची अंमलबजावणी केली नाही. उलट, वारंवार पुनर्वचिार याचिका दाखल करून त्या न्यायालयाने फेटाळण्यात आल्याचा अनुभव उच्चशिक्षण विभागाने घेतलेला आहे. प्राध्यापकांशी सुडबुध्दीने वागण्याचे धोरण कायम ठेवले आहे. प्राध्यापकांना देय असलेली गॅच्युईटीची रक्कम सरकारने अदा केली नाही म्हणून ‘असोसिएशन ऑफ कॉलेज अ‍ॅण्ड युनिव्हर्सटिी सुपर अ‍ॅन्युएटेड टीचर्स’ या संघटनेने दाखल केलेल्या अवमान याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात उच्चशिक्षण सचिव संजय कुमार यांना बिनशर्त माफी मागावी लागली तरी उच्चशिक्षण मंत्री राजेश टोपे स्वत कोणताही निर्णय घेत नाही आणि सचिवांच्या ओंजळीने पाणी पीत आहेत, असा आरोप एम.फुक्टो.चे माजी अध्यक्ष व माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यावरही उच्चशिक्षण विभाग अंमलबजावणी न करता मनमानी कारभार करून प्राध्यापकांना छळत आहे. उच्चशिक्षण विभागातीची अरेरावी कधीतरी थांबली पाहिजे, असे प्रा. बी.टी. देशमुख म्हणाले. राज्य शासनाचा निषेध म्हणून निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर अर्थात, विधानसभा निवडणुकीनंतर एम.फुक्टो. आंदोलन करणार आहे, असे सांगून डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी आंदोलनाचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. सोमवार, २४ नोव्हेंबरला दुपारी १२ ते ४ या वेळात राज्यातील सर्व विद्यापीठ मुख्यालयी त्या त्या कुलगुरू कार्यालयासमोर धरणे आंदोलन, सोमवार, १ डिसेंबरला दुपारी १२ ते ४ या वेळात मुंबई येथे आझाद मदानावर राज्यस्तरीय धरणे आंदोलन, सोमवार, ८ डिसेंबरला राज्यातील सर्व प्राध्यापकांचे सामूहिक रजा आंदोलन आणि सोमवार, १५ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन, असा हा कार्यक्रम आहे.