महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली. या दुर्घटनेत मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच मोठी जीवितहानी झाली आहे. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गावात जवळपास ४२ घरे असून जवळील डोंगराचा एक भाग गुरुवारी संध्याकाळी त्यांच्यावर पडल्याने सर्व जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आता हे गाव पुन्हा वसवण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.

“कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेले तळीये हे पूर्ण गाव वसवण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली स्वीकारली आहे. मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला, कि कुणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती”, असं ट्वीट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी भूस्खलनग्रस्त तळिये गावाला भेट दिली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी या प्रदेशात होणाऱ्या मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली. तसेच, डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते.