सरोज देशपांडे लिखित ‘म्हणावा नवराच आपुला’ या विनोदी कथासंग्रहाचे प्रकाशन ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सचिव संध्याताई दुधगावकर यांच्या हस्ते व लेखक डॉ. आनंद देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडले.
श्रीमती देशपांडे मनोगतात म्हणाल्या की, लहानपणापासूनच विनोदी बोलण्याची, विनोद व नकला करण्याची सवय पुढे लिखाणात परावर्तित झाली. शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांचे लिखाण, त्यांच्या कथाकथनाच्या प्रभावामुळे आपण विनोदी लेखनाकडे वळलो. हा तिसरा कथासंग्रह प्रकाशित होत आहे. श्रीमती दुधगावकर म्हणाल्या की, साहित्यनिर्मिती तेव्हाच होत असते, जेव्हा आपण उघडय़ा डोळ्यांनी समाजात वावरतो. समाजमन समजावून घेत लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केल्यासच निर्मिती होते. सरोज देशपांडे यांच्याकडून चांगले लिखाण होत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. देशपांडे यांनी पुस्तकाची समीक्षा करताना, गंभीर लिखाणात घ्यावी लागते तेवढीच काळजी विनोदी लिखाण करताना घ्यावी लागते, असे म्हटले. विनोदी लेखन करणाऱ्याकडे सूक्ष्म निरीक्षण शक्ती असावी लागते. आपल्या विनोदामुळे कोणी दुखावले जाऊ नये, तसेच विनोदातून कोणावर टीका होऊ नये. उत्कृष्ट दर्जाचा विनोद लिखाणातून निर्माण व्हावा, याची काळजी लेखकाने घेतली पाहिजे. या सर्व कसोटय़ांवर सरोज देशपांडे खऱ्या ठरतात, असे प्रतिपादन डॉ. देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन कु. विद्या टाकरस यांनी केले. गणेश वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. अनंत उमरीकर यांनी स्वागत केले.