नाटय़मय घडामोडीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ऐनवेळी बिनविरोध निवडीच्या हालचाली झाल्या आणि माघारीची मुदत संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना ऐनवेळीच त्या पुन्हा बारगळल्यासुद्धा! ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी व काँग्रेसमधील थोरात गट अशीच युती कायम राहिली असून, या निवडणुकीत काँग्रेसमधील विखे गट मात्र एकाकी पडला. यात भारतीय जनता पक्षाचीही चांगलीच फरपट झाली.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के (सेवा संस्था, राहाता- विखे गट), बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके (सेवा संस्था, पारनेर), माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार राजीव राजळे (सेवा संस्था, पाथर्डी- तिघेही थोरात गट) आणि अरुण तनपुरे (सेवा संस्था, राहुरी) या चौघांची बिनविरोध निवड झाली. आमदार शिवाजी कर्डिले (सेवा संस्था, नगर) व चंद्रशेखर घुले (सेवा संस्था, शेवगाव) यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे.
बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक दि. ५ मेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस होता. आज सुमारे दोनशेपेक्षा अधिक उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यासाठी प्रचंड गर्दीही झाली. त्यात वादही झाले, मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी निर्धारित वेळेत ही प्रक्रिया पूर्ण थांबवून टाकली.