तीन वर्षांत २०० विमानांची जुळणी; सैन्यदले व मदतकार्यासाठी उपयुक्त

मोहनीराज लहाडे, नगर

सैन्य व निमलष्करी दले, नैसर्गिक आपत्तीत मदतकार्य, शेती यासाठी उपयुक्त असलेल्या ‘मायक्रोलाईट एअरक्राफ्ट’च्या उत्पादनाचा भारतात लवकरच श्रीगणेशा होणार आहे. हे पाऊल उचलले आहे ते एका नगरकराने!

‘बॅट हॉक’ मायक्रोलाईट एअरक्राफ्टच्या उत्पादनासाठी मूळचे नगर जिल्ह्य़ातील राहुरीचे उद्योजक विजय सेठी यांच्या कंपनीने दक्षिण आफ्रि केतील ‘मायक्रो एव्हिएशन’ कंपनीशी करार केला. त्यावर आज, शुक्रवारी मुंबईत सह्य झाल्या. येत्या डिसेंबरपर्यंत विमानांचे उत्पादन पुणे येथील प्रकल्पात सुरु करण्याचे सेठी यांचे नियोजन असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. तीन वर्षांत २०० विमानांच्या जुळणीचा हा करार आहे.

‘मेक इन इंडिया’ मोहिमेत या विमानांचे उत्पादन संबंधित सरकारी खात्यांच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण होताच पुण्याजवळ केले जाणार आहे. त्यामुळे मोठा रोजगार उपलब्ध होईल. मुंबईत आज झालेल्या करारावर ‘मायक्रो एव्हिएशन’चे कार्यकारी संचालक टेरी पापस व ‘मॅक्सलिंक अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स प्रा. लि.’चे अध्यक्ष विजय सेठी यांनी सह्य केल्या. या वेळी दक्षिण आफ्रि केच्या व्यापार व उद्योग विभागाच्या, आशिया विभागाचे संचालक तुलानी एम्पेटसेनी, ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’च्या महाराष्ट्र परिषदेच्या अध्यक्ष कश्मिरा मेवावाला, इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेसचे अध्यक्ष मनप्रीत सिंग, दक्षिण आफ्रिकेच्या ‘सामडेक’चे (एक्सपोर्ट काउन्सिल) कार्यकारी संचालक सँडायल एन्डीलोवू उपस्थित होते. हा करार दोन्ही देशांतील औद्योगिक संबंध दृढ करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे मत या मान्यवरांनी व्यक्त केले.

साहसी हवाई क्रीडाप्रकाराची आवड जोपासलेले सेठी म्हणाले, की छंदाचे रूपांतर उद्योगामध्ये करण्याची कल्पना सुचली. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून  हे साध्य करता येईल, हे लक्षात घेऊ न मॅक्सलिंक कंपनीने मायक्रो एव्हिएशन कंपनीशी बोलणी केली. मायक्रोलाईट एअरक्राफ्टच्या निर्मितीत या कंपनीचा मोठा अनुभव असून, त्यांनी आतापर्यंत सुमारे ५०० विमाने उत्पादित करून चीन, ऑस्ट्रिया आदी देशांमध्ये विकली आहेत. याच कंपनीचे तंत्रज्ञान वापरून या विमानांची भारतात जुळणी केली जाणार आहे. त्यासाठी लागणारे अन्य भाग प्राधान्याने स्वदेशी निर्मितीचे असतील.

करारानुसार ‘मॅक्सलिंक’ तीन वर्षांत २०० विमानांची जुळणी करून विक्री करील. सेठी म्हणाले, की दोन व्यक्ती बसण्याची क्षमता असलेल्या या विमानाची किंमत साधारणपणे ४५ लाख रुपये म्हणजे अत्याधुनिक शानदार मोटारीएवढी असेल. इंधन व देखभालीचा खर्च अतिशय कमी असून, नेहमीच्या पेट्रोलवर ते उडते. पेट्रोलचा वापर तासाला १६ लिटर आहे. जगप्रसिद्ध रोटॅक्स इंजिनाचा त्यात वापर केला आहे.

‘बॅट हॉक’ची वैशिष्टय़े

* उड्डाणासाठी व उतरण्यासाठी छोटय़ा म्हणजे फक्त ७० ते ८० मीटर धावपट्टीची गरज. एका मिनिटात एक हजार फू ट वरती जाण्याची क्षमता

* उड्डाणाचा खर्च कमी. साध्या पेट्रोलवरही चालते. तासाभराच्या उड्डाणासाठी १६ लिटर पेट्रोल पुरेसे. सहा तासांची उड्डाणक्षमता.

* प्रतिकूल वातावरणातही उड्डाण करण्याचे डिझाईन. वाईट वातावरणातही ते व्यवस्थित चालविता येते.

* सीमेवर गस्त घालण्यासाठी लष्करी व निमलष्करी दलांसाठी त्याचा मोठा उपयोग

* वेग कमी ठेवण्याची क्षमता. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत मदतकार्य, पाहणीही व्यवस्थित करता येते.

* बॅट हॉक’ मायक्रोलाईट एअरक्राफ्टमधून पिकांवरील फवारणीचे कामही सहज होते.