टेम्पोतून गायी चोरून नेण्याचा प्रयत्न, पोलिसांनी सुरू केलेला पाठलाग, टेम्पोमधून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक आणि पोलीस व्हॅन व जीपला ठोकरून चोरटय़ांचा अंधारात पोबारा, वाहतूक शाखेतील सहायक पोलीस निरीक्षकाने प्रसंगावधान राखून रिव्हॉल्व्हरमधून हवेत केलेला गोळीबार.. शहरातील नांदेड रस्त्यावर बुधवारी मध्यरात्रीनंतर सुमारे अर्धातास एखाद्या हिंदी चित्रपटातच शोभेल असे हे थरारनाटय़ घडले!
शहराच्या नांदेड रस्त्यावरील कन्हेरीतांडा येथे टेम्पोमधून गायी चोरून नेणाऱ्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या व्हॅनला ठोकून टेम्पोचालक पसार झाला. या वेळी पोलिसांनी रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबाराच्या ५ फैरी झाडल्या. मात्र, एवढे सगळे होऊनही हात चोळत बसण्याशिवाय त्यांच्या हाती काही लागले नाही!
नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी पोलीस गस्तीवर तैनात होते. याच वेळी टेम्पोमध्ये गायी चोरून नेत असल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस कन्हेरी तांडय़ाजवळ आले. त्यांना आयशर टेम्पोत चार गायी असल्याचे लक्षात आले. त्यांनी टेम्पोचा पाठलाग सुरू केला. मुख्य रस्त्यावरून आतील बाजूच्या रस्त्यावर व पुन्हा मुख्य रस्त्यावर टेम्पो वळत होता. टेम्पोतून पोलिसांच्या गाडीवर चोरटय़ांनी दगडफेक केली व गाडीच्या काचा फोडल्या. त्याही स्थितीत पोलीस टेम्पोचा पाठलाग करीत होते. वाहतूक शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल खुणे याची माहिती मिळताच आपली व्हॅन घेऊन िरगरोडवर दाखल झाले. मात्र, एखाद्या िहदी चित्रपटात दाखवले जाते, त्याप्रमाणे टेम्पोचालकाने पोलिसांच्या दोन्ही गाडय़ांना ठोकरून पोबारा केला. या वेळी खुणे यांनी प्रसंगावधान राखून हवेत गोळीबार केला. मात्र, टेम्पोचालकावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याही स्थितीत तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. टेम्पोचालकास शोधण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. या प्रकरणी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. टेम्पोचालकाने गाडीची नंबर प्लेट काढल्यामुळे टेम्पोचा तपशील शोधणेही पोलिसांना अवघड जाणार आहे.