निखिल मेस्त्री

स्थलांतरित मजूर पुन्हा घराकडे; पूर्वमोसमी पावसामुळे तारांबळ

खरीप हंगामाला जिल्ह्यात सुरुवात झाली असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाळयापूर्वीची पूर्व तयारी सुरू असल्याचे खेडोपाडय़ात दिसून येत आहे. तसेच शेतातील राबणीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातून मजुरीसाठी स्थलांतरित झालेली कुटुंबे पुन्हा घराकडे शेती आणि घरांची डागडुजी करण्यासाठी परतत आहेत.

यंदा पाऊस उशिराने असल्याचा अंदाज असल्याने या कामांची लगबग नव्हती. परंतु दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने अधूनमधून हजेरी लावल्याने ग्रामीण भागांतील नागरिकांची तारांबळ उडाली.

पाऊस पडेल या भीतीने कुणी घरांची कौले चाळताना तर कुणी घराच्या छपरांची डागडुजी करताना दिसत आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतकरी शेतात राब-राबनी बांध बंदिस्ती करिताना दिसत आहे. याचबरोबर ग्रामीण व दुर्गम भागांतील नागरिक चार महिन्यांची आगोट करून ठेवत आहेत.

कृषी तंत्रज्ञानात वेगवेगळे आधुनिक बदल झाले असले तरी ग्रामीण भागात आजही पारंपरिक शेतीला प्राधान्य दिले जात आहे. तर काही शेतकरी कृषी क्षेत्रातील या नवीन बदलांचा अवलंब करताना पहावयास मिळतात. वेळेसोबत मनुष्यबळ वाचविण्यासाठी अनेकजन पेरणीसाठी ट्रॅक्टर जमीन उखळणीसाठी वापरतात. मात्र ग्रामीण भागात आजही बहुतांश शेतकरी पेरणीसाठी बैलनांगरीने जमिनी उखळणी करीत आहेत. या पद्धतीने जमिनीच्या कसबरोबरीने जमीन उखळण व्यवस्थित होते व येणाऱ्या पिकास हे लाभदायक असल्यामुळे याचा अवलंब ग्रामीण भागात होतो. ग्रामीण भागात आठवडी बाजाराच्या टप्प्या टप्प्यावर असलेल्या लोहाराकडून शेतकरी नांगर, कोयत्या, खुरपणी आदी कृषी हत्यारे डागडुजी तसेच नव्याने बनवून घेतानाची रेलचेल दिसत आहे. तर काही ठिकाणी नांगराकरिता नवीन बैलजोडी, नवीन विळे, नांगराची नवीन फाळणी, नवीन लाकडी नांगर बनवून घेणे आदी साहित्य खरेदी करीत असल्याची रेलचेल शेतकऱ्यांमध्ये पहावयास मिळते.

ग्रामीण भागात बहुतांश घरे ही माती कौलांची असल्यामुळे नागरिक दरवर्षी आपल्या घरची डागडुजी पावसाळ्याधी करायला सुरुवात करतात. घरचे गळके छपरे वाचविण्यासाठी तारपाल टाकणे, जुनी मोडकी कौले बदलणे, शेतात निगराणीसाठी भोंगे बनविणे, शेणामातीची भिंती लिंपणे आदी कामे महिला-पुरुष मिळून करताना पाहायला मिळतात.