प्रशांत देशमुख

वर्धा : औरंगाबाद ते लखनऊ अशा पायीच प्रवासात गलितगात्र झाल्याने वर्ध्यात ग्लानी आलेल्या दहा मजुरांना स्वयंसेवी संस्थांनीच आश्रय दिला. मात्र खबरदारी म्हणून प्रशासनाला सुचित केल्यानंतर या सर्वांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी रेल्वे व अन्य माध्यमातून शासन व्यवस्था करीत आहे. मात्र या सुविधेपासूनही अद्याप बरेच कष्टकरी वंचित असल्याचे हे उदाहरण ठरावे. औरंगाबादच्या एका कंपनीत हे दहाही मजूर कामाला होते. टाळेबंदीत त्यांनी कसेबसे दिवस काढले. मात्र पुढील काळ कठीण असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पायीच लखनऊला निघण्याचे ठरविले.

सतत पाच दिवस पायी चालल्यानंतर त्यांचे प्रकृती ढासळली. शेवटी वर्ध्यातील नागठाणा चौकात ते पहुडले. त्याची माहिती शिक्षक प्रकाश कांबळे यांनी सामाजिक संघटनेला दिली. विकास परिषदेचे चंद्रशेखर मडावी यांनी प्रशासन व पोलीस विभागाला याची माहिती दिली. मात्र कुठल्याच पातळीवर दखल घेतल्या न गेल्याने कांबळे यांनीच या सर्वाची जेवणाची व्यवस्था केली. लाल श्रेणीच्या विभागातून आले असल्याने याबाबत प्रशासनाने त्वरीत दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत प्रहारचे विलास विकास दांडगे यांनी व्यक्त केले.

अखेर रामनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक जळक यांनी तत्परता दाखवीत मजुरांचा आरोग्य विभागाकडे संपर्क करून दिला. शेकडो किमीचा प्रवास करून आल्याने अत्यंत थकलेल्या स्थितीत असलेल्या या मजुरांची प्रथम आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी दोघांची प्रकृती पाहून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी सांगितले.