सांगलीत जिल्ह्य़ातील जत तालुका म्हटले, की एरवी केवळ दुष्काळच डोळय़ांपुढे येतो. पण याच तालुक्यात गेल्यावर्षी म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले आणि या पाण्याने तालुक्यातील तिपेहळ्ळी व बिरनाळ हे तलाव भरले. पाण्याचे हे सुख जतची जनता अनुभवत असतानाच आता या तलावावर हजारो किलोमीटर दूरवरून स्थलांतर करून येणारे रोहित (फ्लेमिंगो), चक्रवाक  सारखे पक्ष्यांचेही आगमन झाल्याने या रुक्ष प्रदेशात सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.

जत तालुक्याचा आजही पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. या भागात फिरू लागले, की दुष्काळ आणि कोरडे पडलेल्या जलव्यवस्था सर्वत्र दिसतात. मात्र, गेल्या वर्षी या दुष्काळी तालुक्यातील काही भागात म्हैसाळ योजनेचे पाणी मिळाले. या पाण्याने जतपासून काही अंतरावर असलेला तिपेहळ्ळी व बिरनाळ तलाव भरण्यात आले. तलावामध्ये बारमाही पाणी यंदा प्रथमच उपलब्ध झाल्याने त्याचे सुख यंदा तालुक्यातील जनता अनुभवत असतानाच आता या जलाशयावर स्थलांतरित पक्ष्यांनी गर्दी केली आहे. यंदाच्या हिवाळ्यात आगमन केलेले हे परदेशी पाहुणे सध्या सर्वत्र आकर्षणाचा विषय ठरला आहे. यामध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले लाल चोचीचे फ्लेिमगो म्हणजेच रोहित, चक्रवाक, स्पूनबिल, िपक पेन्टेड स्टॉर्क म्हणजेच चित्राबलाक असे स्थलांतरित पक्षी लक्षवेधी ठरत आहेत.

दरवर्षी सातारा जिल्ह्यातील मायणी तलावावर येणारे फ्लेिमगो यंदा जतला आल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पक्षी निरीक्षकांना ही एक पर्वणीच लाभली असल्याचे पक्षी निरीक्षक प्रा. संगीता देशमुख यांनी सांगितले.

पोषक थंड हवामान, खाद्य म्हणून आवश्यक असलेले कीटक, लहान मासे, शेवाळ याची सहज उपलब्धता झाल्याने या पक्ष्यांनी या जलाशयास पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले.