News Flash

स्थलांतरित मजुरांचा महाराष्ट्राकडे पुन्हा ओघ सुरू; २५ जुलैपर्यंत अनेक गाड्या फूल

महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परप्रांतीय परतण्यास सुरुवात

संग्रहित

लॉकडाउनमधील निर्बंध शिथील होत असल्याने अनेक व्यवसाय, उद्योगधंदे पुन्हा सुरु झाले आहेत. यामुळे आपल्या घरी परतलेले बिहार, उत्तर प्रदेशातील परप्रांतीय मजूर पुन्हा महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात झाली आहे. पायी तसंच श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून गेलेले अनेक मजूर, कामगार रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत. यामुळे अनेक ट्रेनचं बुकिंग पुढील काही दिवसांसाठी फूल आहे. यामध्ये मुंबई, पुण्यात परतणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

लॉकडाउनमध्ये रोजगार बंद झाल्यानंतर अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी १ मे पासून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आल्या होत्या. या ट्रेनमधून हजारो कामगार आपापल्या घरी गेले होते. यानंतर श्रमिक गाडय़ा वगळता रेल्वेकडून १ जूनपासून देशभरातून विशेष रेल्वे गाडय़ा सुरू करण्यात आल्या. श्रमिक रेल्वे केवळ एकाच दिशेने सोडण्यात आल्या. मात्र, या विशेष गाडय़ा दैनंदिन पद्धतीने दोन्ही बाजूने सुरू करण्यात आल्या.

कोणती गाडी कधीपर्यंत फूल –
दानापूर पुणे स्पेशल – दानापूर (पाटणा) ते पुणे जंक्शन – २० जुलै
खुशीनगर स्पेशल – बादशाहनगर ते लोकमान्य टिळक टर्मिनस – २५ जुलै
पुष्पक एक्स्प्रेस स्पेशल – लखनऊ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस – १७ जुलै

पुणे विभागाला पुणे-दानापूर (पाटणा, बिहार) ही एक गाडी देण्यात आली आहे. पुण्यातून दानापूरसाठी पहिली गाडी १ जूनला सोडण्यात आली. त्यानंतर दानापूरहून पुण्यासाठी ३ जूनला पहिली गाडी सोडण्यात आली. ही गाडी ५ जून रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास पुणे स्थानकावर पोहोचली. त्यातून सुमारे १२०० प्रवासी पुण्यात पोहोचले होते. ही ट्रेनदेखील २० तारखेपर्यंत फूल आहे.

 

करोनाबाबत रेल्वेकडून दक्षता
करोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने श्रमिक रेल्वे गाडय़ांप्रमाणेच विशेष गाडय़ांबाबतही दक्षता घेतली जात असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रवाशाच्या योग्य तपासणीसाठी गाडीच्या वेळेपूर्वी दीड तास स्थानकावर प्रवेश बंधनकारक करण्यात आला आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळ्या प्रवेशद्वारांची व्यवस्था आहे. सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असणाऱ्यांनी प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तपासणीत गंभीर लक्षणं आढळल्यास संबंधिताला प्रवास नाकारण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 6:21 pm

Web Title: migrants returning to maharashtra trains reservation full for next few days sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “त्यांना सुरूवातीला सरकारमध्ये येण्याची स्वप्न पडत होती, पण…”; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीचा टोला
2 पंकजा मुंडेंना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार-चंद्रकांत पाटील
3 इंदुरीकर महाराजांना कोर्टाचे समन्स, ७ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश
Just Now!
X