बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड येथील जागा सैनिकी शाळेसाठी आदर्श जागा असून १२२.८ एकर जागेवर लवकरच महाराष्ट्रातील दुसरी सैनिकी शाळा निर्माण होईल, असे लेफ्टनंट जनरल आर.आर.निंभोरकर यांनी सांगितले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत आज त्यांनी विसापूरजवळील भिवकुंड येथील जागेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. 

जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, प्रभारी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलिल, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ-ठुबे, बल्लारपूरचे प्रभारी तहसीलदार विकास अहीर व अधिकारी या वेळी उपस्थित होते. चंद्रपूर येथील सैनिकी शाळा विदर्भ विकासाच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. सैनिकी शाळा सुरू झाल्यानंतर चंद्रपूर देशाच्या नकाशावर ठळकपणे उमटेल. १९४८ ला बल्लारपूर येथे मोठी लढाई झाली असून या भागाला देशसेवेचा वसा असल्याची आठवण निंभोरकर यांनी सांगितली.
चंद्रपूर येथे सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर शाळा व्हावी, यासाठी १० एप्रिलला विधानसभेत एकमताने हा ठराव मंजूर केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्याच विनंतीनुसार महाराष्ट्र, गुजरात व गोवा क्षेत्राचे लेफ्टनंट जनरल आर.आर.निंभोरकर व त्यांच्या चमूने आज सैनिक शाळेच्या जागेची पाहणी केली. सैनिकी शाळेसंबंधात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचेसोबत आणखी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असून दोन ते अडीच वर्षांत सैनिकी शाळा तयार होईल, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
देशसेवेची प्रेरणा घेऊन या परिसरातील युवक आपले सैनिक होण्याचे स्वप्न पूर्ण करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही जागा सैनिकी शाळेसाठी योग्य असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. चंद्रपूर जिल्ह्याला हा मान मिळत असल्याने पालकमंत्र्यांनी राजेंद्र निंभोरकर यांचे आभार मानले.