स्वीय सहायकाकडून शेतक ऱ्यास मारहाण; मराठवाडय़ात मंत्र्यांना रोषाची सलामी
मराठवाडय़ाच्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा करण्यास आलेल्या मंत्र्यांना उस्मानाबाद, बीड व लातूर या तिन्ही जिल्ह्य़ांत रोषाला सामोरे जावे लागले. उस्मानाबादेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाची बाटली भिरकावली. त्यामुळे चिडलेल्या तावडे यांच्या स्वीय सहायकाने या कार्यकर्त्यांस मारहाण केली. बीड जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसने, तर लातूर जिल्ह्य़ात काँग्रेसने मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. निषेधाच्या घोषणा व सरकारविरोधी रोष प्रकट अनेक शेतकऱ्यांनी मंत्र्यांना प्रश्न विचारले.
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील येडशी येथे दुपारी मंत्री तावडे यांचा दौरा सुरू होता. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी त्यांच्या दिशेने दुधाची बाटली भिरकावली. हे पाहून त्या कार्यकर्त्यांला पकडण्यास पोलीस सरसावले. याच वेळी स्वीय सहायक संतोष सुर्वे यांनी इंगळे यांना मारहाण केली. ते पाहून भाजप कार्यकर्त्यांनाही चेव आला. त्यांनीही इंगळे यांना मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत इंगळे यांना दूर केले. हा सर्व प्रकार वाहिन्यांचे कॅमेरामन टिपत होते. त्यांनाही भाजपचे नितीन काळे, मिलिंद पाटील थांबवत होते. दरम्यान, पोलिसांच्या गराडय़ातील इंगळे यास पोलीस गाडीत बसवण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. किमान कर्जमाफीचा निर्णय तरी तातडीने व्हावा, अशी मागणी इंगळे यांनी केली. पोलिसांनी इंगळे यास अटक केली. या घटनेमुळे भाजपचे सत्ताधारी कार्यकर्ते शेतकऱ्यांशी कसे वागतात, हे दिसून आल्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या रोषात वाढ झाली आहे.
लातूरच्या पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मूक निदर्शने केली. महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोईज शेख, माजी महापौर स्मिता खानापुरे आदींसह कार्यकत्रे या वेळी उपस्थित होते. पाणी आम्हाला, श्रेय तुम्हाला, एकच मागणी उजनीचे पाणी, पाणी डोळय़ात नको, पिण्यास हवे, तुम्हीच सांगा, लातूर महाराष्ट्रातच आहे ना, असे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. उजनीचे पाणी लातूरला द्यावे, शहरात पिण्याच्या पाण्याची अडचण त्वरित सोडवावी, जनावरांना चारा डेपो द्यावा आदी मागण्यांचे निवेदन कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
बीड जिल्ह्य़ात मंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात भाजप व शिवसेनेच्या कार्यशैलीतील फरक कार्यकर्त्यांना आवर्जून दिसून आला. शिवसेनेचे मंत्री थेट लोकांमध्ये घुसून आणि ग्रामपंचायतीत जाऊन माहिती घेत होते, तर भाजप मंत्र्यांचा दौरा ‘गाडी-गाडी’ असाच झाला. बीड शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. मात्र, त्यांच्या आंदोलनात फारसा जोर नव्हता. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली.
मंत्र्यांचे दौरे तीन जिल्ह्य़ांत सुरू असतानाच औरंगाबाद येथे शेतकरी कामगार पक्षाने शक्तिप्रदर्शन करीत मोठा मोर्चा काढला. मराठवाडय़ात शेकापची राजकीय शक्ती नसतानाही त्यांनी मोर्चासाठी मोठी गर्दी जमवली होती. कर्जमाफीसह विद्यार्थ्यांना मोफत भोजनाची सोय करावी, अशा मागण्या आमदार जयंत पाटील यांनी केल्या.

स्वीय सहायकाला दौऱ्यातून काढले
स्वीय सहायक सुर्वे याने मारहाण केल्याबाबत तावडे यांच्याकडे विचारणा केली असता ‘त्याने चूक केली, त्याला या दौऱ्यातून बाजूला करीत असल्याचे सांगत मंत्री तावडे यांनी भाजप कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाचे समर्थनच केले. त्यांच्या कार्यालयाकडून आलेल्या अधिकृत प्रतिक्रियेत मात्र स्वीय सहायक सुर्वेने केलेल्या मारहाणीची पोलीस चौकशी करतील. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हा हल्ला करण्याचा त्यांचा उद्देश काय होता? हल्ला होण्याआधीच संघटनेचे प्रदेश नेते त्याबाबतची विचारणा करीत होते. बातमी मिळाली का, अशी विचारणा होत होती. याचा अर्थ हा हल्ला पूर्वनियोजित होता. शेतकरी हिताचा काम करणारा आणि मराठा आरक्षणासाठी लढणारा मंत्री म्हणून स्वाभिमानी संघटनेचा माझ्यावर राग आहे का, याचे उत्तर संघटनेने द्यायला हवे, असे तावडे यांनी नमूद केले आहे.