दूध दरवाढीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या दूध पुरवठ्यावर परिणाम झाला. पुण्यात चितळे समुहाचे दूध वितरण आज (गुरुवारी) बंद असून मुंबईतील काही भागांमध्ये दुधाचे टँकर पोहोचू शकलेले नाहीत.

दूध उत्पादकांना लिटरमागे ५ रुपये जादा मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दूध संकलन बंदीचे आंदोलन सुरु केले आहे. गुरुवारी या आंदोलनाचा चौथा दिवस असून गुजरातमधून राज्यात विशेषत: मुंबईत दूध येऊ नये म्हणून खासदार राजू शेट्टी पालघरमध्ये ठाण मांडून आहेत.

दूध कोंडी आंदोलनाचा परिणाम आता जाणवू लागले आहेत.  गुरुवारी मुंबईत दुधाचा पुरवठा उशिराने होत असून काही भागांमध्ये दुधाचे टँकर पोहोचू शकलेले नाही. तर पुण्यात तीन दिवसांपासून चितळेचे दूध संकलन बंद असून गुरुवारपासून चितळे समुहाचे दूध वितरण बंद करण्यात आले आहे.

दूध दरवाढीच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी राज्य सरकारच्या वतीने रात्री गिरीश महाजन यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत तोडगा निघू शकलेला नाही.हक्काचे पैसे मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, असे राजू शेट्टी यांनी माध्यमांना सांगितले. तर दूध उत्पादकांच्या मागणीसंदर्भात सरकार अनुकूल असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

गुरुवारी दुपारी नागपूरमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे समजते.