News Flash

शेतकऱ्यांकडील दूध थेट ग्राहकांच्या दारात

एकेकाळी दुधाचे आगर अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्य़ाला सध्यादुधासाठी पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून राहावे लागते आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

एकेकाळी दुधाचे आगर अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्य़ाला सध्यादुधासाठी पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून राहावे लागते आहे. परंतु आता भेसळयुक्त दुधापासून रायगडकरांची  लवकरच मुक्तगता होणार आहे. सहकार विभागाच्या प्रेरणेने आणि रायगड बाजारच्याच माध्यमातून जिल्हय़ातील ग्राहकांना दर्जेदार दूध माफक दरात उपलब्ध होणार आहे. मध्यस्थांची साखळी तोडून शेतकऱ्यांकडील दूध थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा अभिनव प्रयोग प्रथमच जिल्ह्य़ात राबवला जात आहे.

रायगड जिल्हय़ात दुधाचे प्रचंड उत्पादन होत असे, परंतु वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शेतीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले. नोकरी आणि रोजगाराची पर्यायी संधी उपलब्ध होत असल्याने पशुपालनाचा व्यवसाय कमी होत चालला आहे.

जिल्ह्य़ातील काही भागांत दुधाचे उत्पादन घेतले जाते, मात्र ते अत्यल्प आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नागरीकरण झाले आहे. त्यामुळे येथील दुधाची गरज जिल्ह्य़ात भागू शकत नाही. अशा वेळी बाहेरून येणाऱ्या पिशवीबंद दुधावरच अवलंबून राहावे लागते. जिल्ह्य़ात बहुतांश दूध हे पश्चिम महाराष्ट्रातून आयात करावे लागते.

दूध हे पूर्ण अन्न मानले जात असले तरी त्यातील भेसळ ही चिंताजनक आहे. दुधाच्या भेसळीबद्दल उच्च न्यायालयातही चिंता व्यक्त करण्यात आली. पिशवीबंद दुधाची विक्री करत असताना त्यातील मलई काढून कमी प्रतीचे दूध ग्राहकांच्या माथी मारले जाते. अशा वेळी सहकारी तत्त्वावर शेतकऱ्यांकडील दूध थेट ग्राहकांच्या दारात पोहोचवण्याचा अभिनव प्रयोग जिल्ह्य़ात राबवला जात आहे.

नगर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांकडून गाई-म्हशीचे दूध संकलित करून रात्री तेथेच ते पाश्चराइज करून पिशवीबंद केले जाणार आहे. विशेष म्हणजे या दुधातील मलई काढली जाणार नाही. गायीचे दूध प्रतिलिटर ३५ रुपये तर म्हशीचे दूध प्रतिलिटर ४७ रुपये या दराने पुरवले जाणार आहे. सुरुवातीला हा प्रयोग अलिबागमध्ये राबवला जाणार आहे.

अलिबाग आणि परिसरात ज्यांना हे दूध घरपोच हवे असेल त्यांनी आपली नोंदणी रायगड बाजार येथे करावी तसेच अलिबाग, पेण, खालापूर, उरण, पनवेल आदी तालुक्यांमध्ये या दुधाची एजन्सीदेखील दिली जाणार आहे. अशा प्रकारे दूध माफियांच्या

मक्तेदारीतून दूध उत्पादक आणि ग्राहक यांची सुटका करून दोघांचाही फायदा करून देणारा पथदर्शी प्रकल्प रायगड जिल्ह्य़ात आकाराला येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 1:15 am

Web Title: milk revolution in raigad district
Next Stories
1 लोणेरेजवळील भीषण अपघातात २ ठार
2 ‘गृहराज्यमंत्र्यांच्या शहरातच अवैध धंदे
3 रत्नागिरी-सिंधुदुर्गची सरासरी दीड हजार मिलिमीटरवर
Just Now!
X