पाच वर्षांत २७७ नागरिकांचा मृत्यू, प्रदूषित कालबाह्य़ संच बंद करण्याची मागणी
वीज केंद्र, कोळसा खाणी व इतर घटकांच्या वाढत्या प्रदूषणामुळे चंद्रपूरमधील सव्वालाख लोकांना श्वसन, त्वचा व हृदयविकाराचा आजार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रदूषित संच तातडीने बंद करावे, अशी मागणी २५ स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. शहरात क्षयरोग, त्वचेचे विकार, अॅसिडिटी, उच्च रक्तदाब, दमा, श्वसनाचे विकार यामुळे २०११-१२ याच वर्षी १०२ लोकांचा मृत्यू झालेला आहे. २०१३-१४ मध्ये ९० तर २०१४-१५ मध्ये लोकांचा मृत्यू झालेला आहे. या शहरातील प्रदूषण पाच वर्षांत एकूण २७७ लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील संचामधून मोठय़ा प्रमाणात फ्लाय अॅश वातावरणात सोडली जात आहे. यामुळे दिवसेंदिवस दमा, खोकला, सर्दी, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार, फुप्फुसांचे आजार, श्वसनाचे आजार मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते राजेश बेले यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीच्या आधारे एकटय़ा चंद्रपूर शहरात श्वसनाच्या आजाराचे १७ हजार रुग्ण आढळले आहेत. त्वचा विकाराचे ५०० रुग्ण दर वर्षी सरकारी रुग्णालयात येत आहेत. मागील ५ वर्षांत श्वसनाच्या विकाराचे तब्बल ८८ हजार ५६३ रुग्ण चंद्रपुरात आढळले, तर त्वचारोगाच्या रुग्णांची संख्या २५ हजारांवर नोंदवलेली आहे. त्यापैकी ३४३ लोकांचा मृत्यू या कारणांनी झालेला आहे, अशीही माहिती मिळाली आहे. २०१०-११ या एकाच वर्षांत २७ लोकांचा मृत्यू प्रदूषणाशी निगडित आजारांशी झाला होता, असा शेरा सामान्य रुग्णालयाने दिलेला आहे.

प्रदूषण कारण
चंद्रपुरातील महाऔष्णिक वीजकेंद्रात १९८३ ते १९८६च्या काळात सुरू झालेले २१० मेगाव्ॉटचे चार संच कालबाहय़ झाले असून ते प्रदूषणास कारणीभूत आहेत. संच क्रंमाक एक याच कारणामुळे बंद करण्यात आला. तर एका वीज निर्मिती संचाचे सरासरी आयुष्य २० ते २५ वर्षांचे असताना येथील संच क्रमांक दोन मागील ३१ वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे अधिक प्रदूषण करणारा हा संचही त्वरित बंद करावा अशी मागणी येथील विविध सामाजिक संघटना तसेच पर्यावरणीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे. चंद्रपूर शहर देशात प्रदूषणाच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. हवा प्रदूषणाच्या बाबतीत तर ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाच्या या शहरातील हा वीज कारखाना आता कालबाहय़ झालेला आहे.

कालबाह्य़ संच
येथील संच क्रमांक दोनच्या चिमणीची उंची फक्त ९० मीटर इतकी आहे. हा संच १९८४ साली कार्यान्वित करण्यात आलेला असून त्याचे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर्स मुळातच ७५७ मायक्रोग्रॅमस प्रतिघनमीटर या प्रदूषणाच्या स्तरावर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे ते प्रदूषण नियंत्रण मंडळाने सध्याचे मानक म्हणून घालून दिलेल्या १०० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर या स्तरापर्यंतच्या उत्सर्जनाच्या मर्यादेत राहू शकत नाहीत, असे करण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले आहेत. २००३ तसेच २००७ साली ईएसपी र्रिटोफिटिंग करण्यात आले, तर २०१० साली अमोनिया डोजिंग सिस्टमवर कोटय़वधी रुपये खर्चूनही प्रदूषणाचा स्तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अभ्यासानुसार ६४२.९२ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरच्या वरच आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संच क्रमांक दोन ताबडतोब बंद करावा अशा आशयाचे पत्र वीज कंपनीला दिले आहे, असे असतानाही वीजनिर्मिती मंडळाची अवैध वीजनिर्मिती सुरूच आहे. संच क्रमांक २, ३ व ४ मोठय़ा प्रमाणात प्रदूषण करीत आहेत.