हर्षद कशाळकर

संकटामधील संधी शोधून त्यावर सातत्यपूर्ण काम केले तर यशाचा मार्ग सापडतोच. रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतदार डॉ. संदेश पाटील यांना भेटल्यावर याचाच प्रत्यय येतो. करोना आणि टाळेबंदीमुळे ऐन हंगामात आंबा बागायतदारांपुढे मोठे संकट उभे ेराहिले होते. मात्र संदेश पाटील यांनी डगमगून न जाता. थेट विक्रीचे धोरण स्विकारले. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. आंबा विक्रीतून लाखो रुपयांची कमाई झालीच पण टाळेबंदीवर मात करणे शक्य झाले.

टाळेबंदीमुळे जगभरातील उद्योग आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारी आणि आर्थिक संकटाचे ढग दाटून आलेत. शेती आणि शेतीपूरक उद्योगही याला अपवाद नाहीत. पण  ग्राहक ते उत्पादक आणि उत्पादक ते ग्राहक अशी साखळी तयार करण्यात यश आले तर या संकटावर मात करता येते, शेतमालाला चांगला दर मिळू शकतो. यात ग्राहक आणि शेतकरी दोघांचाही फायदा होतो. हेच डॉ. संदेश पाटील यांनी दाखवून दिले आहे.

ऐन हंगामात टाळेबंदी सुरु झाल्याने कोकणातील आंबा बागायतदार धास्तावले होते. उत्पादित मालाचे करायच काय? हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. बाजारातील अनिश्चितता कायम होती. मात्र या परिस्थितीवर मात करण्यासाठी डॉ. संदेश पाटील यांनी थेट ग्राहकांपर्यंत आंबा विक्री करण्याचे धोरण अवलंबिले. काही सहकाऱ्यांच्या मदतीने आंबा कंटेनर वाहतुकीच्या माध्यमातून थेट  दुबई पर्यंतही पाठवला.

राज्यातील विविध भागात आंबा विक्रीसाठी उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण केली. यामुळे टाळेबंदीमुळे निर्माण झालेले संकट आपणहूनच दूर झाले. आणि आंबा वितरण आणि विक्रीतील अडचणी कमी होत गेल्या.

सुरूवातीला ७० टक्के किमतीत त्यांनी आंब्याची विक्री सुरू केली. सुरूवातीला पॅकेजिंग आणि मार्केटींगची समस्या होती. नंतर मात्र तीही दूर होत गेली.  पणन महामंडळाचे अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार त्यांना सहकार्य केले. यामुळे मुंबई, नवीमुंबई, ठाणे, पुणे, जळगाव या जिल्ह्यात आंबा विक्रीसाठी पाठविण्यात त्यांना करण्यात यश आले. रायगड जिल्ह्यातही अनेक भागात वितरणाची साखळी निर्माण झाली. त्यामुळे दररोज जवळपास सातशे ते आठशे पेटय़ा वितरणासाठी पाठविण्यात त्यांना यश आले. यातून टाळेबंदीमुळे ओढावलेल्या आर्थिक संकटावर मात करता आली.

करोनासारख्या संकट काळात  शेतकऱ्यांनी आता थेट विक्रीचे तंत्र अवलंबणे गरजेचे आहे. यातून शेतकऱ्यांना जादा नफा मिळतो, त्याचप्रमाणे ग्राहकांनाही चांगल्या प्रतीची फळे चाखता येतात.

– डॉ.संदेश पाटील, आंबा बागायतदार