स्वबळाचा नारा देत मैदानात उतरलेल्या प्रमुख पक्षांमध्ये दोन्ही काँग्रेसच्या तुलनेत भाजप व शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व राखल्याचे शहरासह जिल्ह्य़ातील ९ मतदारसंघांमधील चित्र आहे. भाजप, शिवसेनेला प्रत्येकी ३, तर काँग्रेस, राष्ट्रवादी व एमआयएमला प्रत्येकी एक जागा मिळाली. विशेष म्हणजे शहराच्या तिन्ही मतदारसंघांत भाजप, शिवसेना व एमआयएम याच तीन पक्षांमध्येच पहिल्या तीन क्रमांकांसाठी रस्सीखेच झाली. औरंगाबाद पूर्वचा अपवाद वगळता या तिन्ही पक्षांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला चौथ्या वा पाचव्या क्रमांकावर ढकलले. पूर्वमध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर असली, तरी या पक्षाला आपली अनामत वाचवता आली नाही.
स्वबळावर लढत दिल्यानेच भाजप व शिवसेनेच्या पदरात प्रत्येकी ३ जागांचे दान पडले. औरंगाबाद मध्य, गंगापूर व फुलंब्री येथे भाजप, तर औरंगाबाद पश्चिम, पैठण व कन्नड येथे शिवसेनेचा विजय झाला. काँग्रेसने सिल्लोड व राष्ट्रवादीने वैजापूरची जागा जिंकली. पैठण व कन्नडमध्ये राष्ट्रवादीला दुसऱ्या, तर गंगापूर व फुलंब्रीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. काँग्रेसला फुलंब्रीत दुसऱ्या, वैजापूरला तिसऱ्या, तर गंगापूर, पैठण व कन्नडमध्ये चौथ्या क्रमांकाची मते मिळाली.
तीन जागा जिंकणाऱ्या भाजपला औरंगाबाद पश्चिम व सिल्लोडमध्ये दुसऱ्या, औरंगाबाद मध्य, पैठण व कन्नडमध्ये तिसऱ्या, तर वैजापूरला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. शिवसेनेला औरंगाबाद मध्य, गंगापूर व वैजापूरमध्ये दुसऱ्या, सिल्लोडमध्ये तिसऱ्या, तर फुलंब्रीत चौथ्या क्रमांकाची मते मिळाली.
पहिल्याच प्रयत्नात औरंगाबाद मध्यमध्ये विजयाचा झेंडा रोवणाऱ्या एमआयएमने पूर्वमध्ये दुसऱ्या, तर पश्चिममध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली. शहरातील तिन्ही मतदारसंघांत भाजप-शिवसेनेसह या पक्षाची चुरस होती. या तिन्ही ठिकाणी दोन्ही काँग्रेसची डाळ शिजली नाही. प्रमुख उमेदवारांमध्ये प्रदीप जैस्वाल (शिवसेना), किशनचंद तनवाणी (भाजप), मधुकर सावंत (भाजप), डॉ. गफ्फार कादरी व गंगाधर गाडे (एमआयएम) यांनी चुरशीच्या लढतीत चांगली मते घेतली. मात्र, राजेंद्र दर्डा व एम. एम. शेख (काँग्रेस), कला ओझा (शिवसेना), विनोद पाटील (राष्ट्रवादी) आदींना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही.
भाजप-एमआयएममध्ये चुरस!
शहरातील तिन्ही मतदारसंघांत १ लाख ५९ हजार ६५३ मतांसह भाजप पहिला, तर १ लाख ५७ हजार ४५९ मतांसह एमआयएमने दुसरा क्रमांक, तर १ लाख १४ हजार ५५२ मते घेऊन शिवसेनेने तिसरा क्रमांक मिळवला. काँग्रेसला ४५ हजार १९३ व राष्ट्रवादीला १९ हजार १६१ मते मिळाली. मनसेला जेमतेम ९ हजार ५६८, तर बसपला २० हजार ८११ मते मिळाली. भाजप व एमआयएमला मिळालेल्या मतांमध्ये केवळ २ हजार १९४ मतांचा फरक आहे.