गेली अनेक वर्षे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाला दांडी मारताना दिसत आहेत. यावरून शिवसेनेनं जलील यांच्यावर टीकाही केली होती. तसंच त्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं वावडं आहे आणि ते स्वत:ला निजामाचे वारसदार समजतात असं म्हणत त्यांच्यावर निशाणाही साधला होता. परंतु या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अनुपस्थित होते. त्यांनी मुंबईहून ऑनलाइन पद्धतीनं या कार्यक्रमाला उपस्थितीत दर्शवली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून आता जलील यांनी निशाणा साधला आहे.

“मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास माझी अनुपस्थिती म्हणजे राष्ट्रविरोधी आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का ? आता निष्ठेचे प्रमाणपत्र देणारे आणि मीडिया गप्प का आहे ?,” असा सवाल त्यांनी केला आहे.

“शिवसेनाप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास येण्यास स्पष्ट नकार दिला. मराठवाड्याबद्दल माझ्या सचोटी आणि निष्ठेवर प्रश्न विचारणारे मुख्यमंत्र्यांना का विचारत नाही?, यालाच मी दुहेरी मापदंड म्हणतो,” असंही ते म्हणाले.

दुष्काळग्रस्त होऊ नये म्हणून खबरदारी – मुख्यमंत्री

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतून ऑनलाइन पद्धतीनं उपस्थित होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केलं. तसंच भविष्यात मराठवाडा दुष्काळग्रस्त होऊ नये म्हणून खबरदारी घेतली असल्याचंही ते म्हणाले.

दरवर्षी होतो कार्यक्रम

स्वामी रामानंद तीर्थ, आ. कृ . वाघमारे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी मोठा लढा दिला. अनेकांनी हौतात्म्य पत्करले. भारत सरकारने ‘ऑपरेशन पोलो’ हातात घेत हैदराबाद संस्थान विलीन करून घेतले. या सशस्त्र कारवाईनंतर अनेक वर्षे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात असे. मात्र, त्याला पुढे शासकीय स्वरूप देण्यात आले. दरवर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण करण्यात येते.