गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं उघडण्याची सातत्यानं मागणी केली जात आहे. यातच आता एमआयएमनंही उडी घेतली. मंदिरं आणि धार्मिक स्थळं उघडण्यावरुन एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील आणि शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. “हिंदू धर्माचा ठेका कोणा एकाकडे नाही आणि हिंदू मंदिरं तसंच धर्माला कोणीही आपली मक्तेदारी समजू नये,” असं जलील खैरे यांना म्हणाले. जलील यांनी मंदिरं उघडण्यासाठी आदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गणरायाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विनंतीनंतर आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

“मी इथेच उभा आहे. मंदिर कसं उघडतं ते पाहू. मंदिरं उघडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत,” असं खैरे म्हणाले होते. त्यावर जलील यांनी उत्तर दिलं. “हिंदू धर्माचा ठेका कोणा एकाकडे नाही. मंदिरं आणि हिंदू धर्माला कोणाही आपली मक्तेदारी समजू नये. ज्यांना धर्माच्या नावानं राजकारण करायचं असतं तेच असा वाद घालत असतात,” असं म्हणत जलील यांनी खैरे यांच्यावर निशाणा साधला. “मी जनतेचा खासदार आहे आणि मी जनतेचे प्रश्न सोडवणार. मंदिरात गेलो तरी मी मंदिराचं पावित्र्य राखणार. माझ्यासोबत त्या ठिकाणी हिंदू बांधवही असतील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारनं १ सप्टेंबरपासून मंदिरं उघडावी आणि २ तारखेला मशिदी उघडू असं अल्टिमेटम जलील यांनी राज्य सरकारला दिलं होतं. २७ ऑगस्ट रोजी त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं होतं.

आणखी वाचा- “वातावरण बिघडवण्याचा डाव उधळला गेला,” प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलनावर शिवसेनेची टीका

काय म्हमाले खैरे?

मी याच ठिकाणी उभा आहे. मंदिर कसं उघडतं ते पाहूच. आम्ही मंदिरं उघडण्यासाटी समर्थ आहोत. मंदिरं उघडा हे सांगणारे जलील कोण आहेत? हे सर्व राजकारण असून त्यांना राजकारण करायचं आहे. शिवसेनेनं हिंदुत्वाची भूमिका सोडली असल्याचं त्यांना दाखवायचं असून शिवसेनेला बदनाम करण्याचा त्यांचा डाव असल्याचे खैरे म्हणाले. “दोन दिवसांनंतरही मी मंदिरासमोर उभा राहिन. तुम्ही येऊन दाखवा. मुख्यमंत्र्यांचा आदेश असेल तर तो आदेश आम्ही नक्कीच पाळू. मुख्यमंत्री आदेश देतील तेव्हा आम्ही मंदिरं उघडू. ते मंदिरं उघडणारच आहेत. पण यावर राजकारण का करावं?” असा सवालही त्यांनी केला.