उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एमआयएमच्या नेत्याने विझलेला दिवा म्हणून संबोधले आहे.  एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी मनसे अध्यक्षे राज ठाकरे यांचा समाचार घेतला.  “राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा आहेत, त्यांच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही,” असे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी म्हटले. मनसेने पाकिस्तानी कलाकारांना  ४८ तासांत भारत सोडून जाण्याचा इशारा शुक्रवारी  दिला होता. पाकिस्तानातील अनेक कलाकार विविध कार्यक्रमांसाठी सध्या मुंबईत आहेत. या कलाकारांनी ४८ तासांत देश सोडला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्यांना पळवून लावेल असे  मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटले होते. मुंबई पोलिसांनी मनसेच्या या भूमिकेनंतर अमेय खोपकर यांच्यावर शनिवारी नोटीस बजावली होती. मात्र, यानंतरही मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे खोपकर यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे रविवारी मनसे पाकिस्तानी कलाकारांवर आक्रमकता दाखविणार का? असे चित्र निर्माण झाले होते. मात्र अद्याप मनसेने कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांवरोधात आक्रमक रुप धारण केलेले नाही.

वारिस पठाण यांनी पाकिस्तानी कलाकारांना दिलेली ४८ तासांची मुदत संपली आहे, त्यानंतर मनसेने काय केले, असा सवाल करत राज ठाकरेंना फटकारले आहे. पाकिस्तानी कलाकारांना धमकी देणाऱ्या मनसेला प्रसारमाध्यमांनी उचलून धरु नये, असे आवाहन देखील वारिस पठाण यांनी  सोलापूरमधील पत्रकार परिषदेत केले. राज ठाकरे यांच्यावर हल्ला केल्यानंतर वारिस पठाण यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्याला हात घातला. राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज एकवटला असताना त्यांनी मुस्लिमांना देखील आरक्षण मिळायला हवे, असे म्हटले.  मराठ्यांना आरक्षण द्या, असे सांगत पठाण यांनी मुस्लिम समुदायाच्या आरक्षणाबाबतही सरकारने विचार करावा, असे सांगितले.