सध्या देशात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच सण आणि उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन सरकारक़डून करण्यात आलं आहे. दरम्यान, ईदही साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ईद साधेपणानं साजरी करावी, असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी ईदसाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली होती. या नियमावलीला एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी विरोध केला आहे. “करोनाना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियम आम्हालाच का? ५ ऑगस्टचा राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही प्रतीकात्मरित्या करायला सांगा,” असं ते म्हणाले.

यावेळी ईदच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदी विक्री करण्याचं आवाहन शासनानं केलं आहे. यावरून जलील यांनी सरकारवर टीका केली आहे. “ज्यांना शक्य असेल ते ऑनलाइन पद्धतीनं खरेदी विक्री करतील. परंतु एक दोन जनावरं असलेल्यांनी काय करावं? नेत्यांकडे अधिकाऱ्यांकडे स्मार्टफोन असतात. परंतु गरीबांकडे ती सोय नसल्यानं त्यांचा विचार कोण करणार? जनावरांची विक्री करून दोन पैसे मिळवणाऱ्यांचा विचार कोणी करायचा?,” असे सवाल त्यांनी केले.

नियम आमच्याचसाठी का?

“करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठरवण्यात आलेलेले नियम आमच्याचसाठी आहेत का?,” असा सवालही त्यांनी यावेळी केला, “गर्दी टाळण्यासाठी आम्हाला निर्देश देण्यात येत आहेत. हेच नियम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लागू होत नाहीत का? त्यांनीदेखील ५ ऑगस्ट रोजीच्या राम मंदिराच्या भूमिपूजनचा कार्यक्रम दिल्लीतून प्रतीकात्मकरित्या करावा,” असं म्हणत जलील यांनी पंतप्रधानांवरही निशाणा साधला.

“श्रावण, गणेशोत्सव, मोहरम आता येणार आहे. तसंच १ ऑगस्ट रोजी ईद-उल-अजहा साजरी केली जाणार आहे. त्यामुळे नियम आणि अटींसह धार्मिक स्थळं उघडण्यात यावी आणि नमाज ईदगाहवर अदा करू द्यावी अशी मागणी मौलवींनी केली आहे. प्रतीकात्मक कुर्बानी अशक्य आहे. ती कशी असते हे शासनानं स्पष्ट करावं,” असंही जलील म्हणाले.