‘एमआयएम’ हा देशद्रोही पक्ष असून, या पक्षावर बंदी घालण्याची मागणी करणा-या काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांना ‘एमआयएम’ने कायदेशीर नोटीस बजावली आहे. वादग्रस्त वक्तव्याबद्दल येत्या आठ दिवसात माफी मागा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार रहा, अशा आशयाची नोटीस आमदार शिंदे यांना पाठविण्यात आली आहे.
“देशद्रोही, दहशतवादी आणि एमआयएम यांच्यात फरक नाही, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घाला” अशी आगपाखड प्रणिती शिंदे यांनी केली होती. प्रणिती शिंदेंनी आक्षेपार्ह वक्तव्याची माफी मागावी, अशी मागणी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही केली होती. त्यानंतर आता एमआयएमच्या वकिलांनी प्रणिती शिंदेंना नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे एमआयएमची माफी मागणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.