एमआयएमच्या सात नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन

बीड नगरपालिकेत एमआयएमच्या निवडून आलेल्या नऊ नगरसेवकांपकी सातजणांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करून जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे पालिकेत उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची रस्सीखेच वाढली असून काकू नाना आघाडीच्या २० नगरसेवकांना एमआयएमच्या स्वतंत्र गटाने समर्थन दिल्यानंतर पालिकेत काठावर निवडून आलेले राष्ट्रवादीचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासमोरच्या अडचणी वाढणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी पुतणे संदीप क्षीरसागर यांनी नगरसेवकांची जुळवाजुळव करत काका भारतभूषण क्षीरसागर यांची पुरती कोंडी करण्याचा प्रयत्न चालवल्याचेच चित्र आहे.

बीड नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची १० जानेवारीला निवड होणार आहे. यासाठी अंतर्गत फोडाफोडीचे राजकारण तेजीत आले आहे.  नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना अवघ्या दीड हजार मतांनी निसटता विजय मिळाला. राष्ट्रवादीचे-१८, काकू नाना विकास आघाडीचे-२०, भाजप शिवसेना-३, एमआयएम-९ असे संख्याबळ आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निसटता पराभव झाला असला तरी पालिकेत नगरसेवकांच्या संख्याबळावर काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची कोंडी करण्याचे राजकीय डाव पुतणे संदीप क्षीरसागर यांनी टाकले आहेत. एमआयएमच्या सात नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे आघाडीच्या पाठीमागे स्वतंत्र गटाच्या सात सदस्यांनी समर्थन दिले तर पालिका सभागृहात २७ नगरसेवक डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात उभे राहतील. परिणामी उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीचे हेमंत क्षीरसागर हे मदानात उतरण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा क्षीरसागर कुटुंबातील काका-पुतण्यातील राजकीय डावपेच रंगू लागले आहेत.

दुसऱ्या बाजूला भाजप-सेनेचे नगरसेवक तटस्थ राहण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढण्याची शक्यता कमी मानली जात आहे.