ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात अवघ्या २०० ते २५० रुपयात व्याघ्र भ्रमंतीचा आनंद घेता येणार आहे. उद्या, स्वातंत्र्य दिनापासून ताडोबात मिनीबस सेवा सुरू होत असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यटकांना अतिशय माफक दरात जंगल सफारी उपलब्ध करून दिली आहे.
ताडोबातील निसर्ग पर्यटनासाठी उद्या दुपारच्या फेरीपासून मिनिबस सेवा सुरू करण्यात येत आहे. १६ ऑगस्टपासून सकाळी ६.३० व दुपारी २.३० अशा नियमित फेऱ्या पर्यटकांसाठी सोडल्या जाणार आहेत. सकाळची फेरी ६.३० वाजता चंद्रपूरवरून निघून मोहुर्ली प्रवेशव्दारावर वाहनांची नोंद करून निसर्ग पर्यटनासाठी जाईल. पूर्वीच्या निर्धारित वेळेनुसार मोहुर्ली प्रवेशव्दारावर आल्यावर नोंद करून चंद्रपूरला परत येईल. दुपारची फेरी २.३० वाजता चंद्रपूरवरून निघून मोहुर्ली प्रवेशव्दाराजवळ वाहनांची नोंद करून निसर्ग पर्यटनासाठी जाईल. पूर्वीच्या निर्धारित वेळेनुसार मोहुर्ली प्रवेशव्दारावर आल्यावर नोंद करून चंद्रपूरला परत येईल. पर्यटकांसाठी मिनीबसचे भाडे कार्यालयीन कामाच्या दिवशी प्रती पर्यटक २०० रुपये, तर शासकीय सुटीच्या दिवशी प्रती पर्यटक २५० रुपये राहणार आहे. १९ आसनांच्या मिनीबसचे आरक्षण वाहन आसनानुसार २ दिवस आधी करण्यात येईल. ही बस मूल रोडवरील मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालकांच्या कार्यालयापासून सुटेल, अशी माहिती ताडोबा प्रकल्पाचे उपसंचालक कळसकर यांनी दिली.
वन्यजीवांच्या सहज दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प विशेष उल्लेखनी४य आहे. या प्रकल्पात गवे, सांबर, चितळ, वाघ, बिबट, रानकुत्री, फुलपाखरे, नानाविध पक्षी, निरनिराळ्या वनस्पती आहेत. ही जैवविविधता बघण्यासाठी व धकाधकीच्या जीवनातील ताणतणाव दूर व्हावे म्हणून मोठय़ा प्रमाणात निसर्गप्रेमी पर्यटक या प्रकल्पास भेट देतात. ताडोबात निसर्ग पर्यटन शास्त्रीय आधारावर व्हावे आणि पर्यटनाचा वन्यजीव व त्यांच्या अधिवासावर प्रतिकुल परिणाम होऊ नये ही बाब ध्यानात घेऊन निसर्ग पर्यटनाचा आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार पर्यटन नियंत्रण केले जाते. वन्यजीवांच्या गरजा, क्षेत्राची भारक्षमता विचारात घेऊन पर्यटक, वाहनांची संख्या निश्चित करण्यात येते. आता मिनिबस सेवा सुरू होणार असल्यामुळे पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणे सोयीचे झाले आहे.
विशेष म्हणजे, पूर्वी ताडोबा भ्रमंतीसाठी चार ते पाच हजार रुपये एका कुटुंबाला खर्च येत होता. आता प्रती व्यक्ती २०० ते २५० रुपये खर्च येणार असल्याने सर्वसामान्य पर्यटकांनाही जंगल सफारीचा लाभ घेता येणार आहे.