मोठय़ा कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी नगर, राहुरी, पारनेर तालुक्यांत जमीन उपलब्ध झाल्यास ‘सेझ’संदर्भात खासदार दिलीप गांधी यांनी दिलेल्या प्रस्तावाचा विचार करण्याचे आश्वासन केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी दिले.
शिर्डीहून पुण्याला जाताना राधाकृष्णन काही वेळासाठी खासदार गांधी यांच्या निवासस्थानी थांबले होते, त्या वेळी गांधी यांनी या तीन तालुक्यांत पडीक जमिनी उपलब्ध असल्याने मोठय़ा कंपन्यांसाठी सेझमार्फत चालना देण्याची मागणी केली, त्यासंदर्भात ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत तामिळनाडू भाजपचे महामंत्री मोहन राजाल, सचिव मानती श्रीनिवासन, नगरसेवक सुवेंद्र गांधी, सुनील रामदासी, अशोक शिरसाठ आदी उपस्थित होते.
मुंबई-दिल्ली या सुवर्ण औद्योगिक मार्गिकेमध्ये नगरचा समावेश करावा, या गांधी यांच्या मागणीचाही विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. रेल्वेच्या दरात झालेली वाढ ही मागील काळातील काँग्रेस सरकारचेच देणे आहे, त्यांच्याच काळात ती प्रस्तावित करण्यात आली होती, असाही दावा त्यांनी केला. केंद्र व राज्य सरकारमध्ये समन्वय असेल तर योजना प्रभावीपणे राबवता येतात, विकास करणे शक्य होते, त्यामुळे महाराष्ट्रातही आता परिवर्तन घडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.