राज्यातील शिवसेनेचे सरकार फारकाळ टिकणारे नाही. शिवसेना दडपणाखाली काम करत आहे, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी, आता वाघाची शेळी झाली, या शब्दांत शिवसेनेला टोला लगावला.

लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवडणूक सोमवारी होत असून भाजपच्या ताब्यात लातूरची जिल्हा परिषद राहील. सरकार बदलले म्हणून त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणावर होणार नसल्याचा दावाही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. भाजपच्या कोअर ग्रुपची बठक झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांची वैयक्तिक मते आपण जाणून घेतली. एकमताने भाजपा अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड होईल व ते निवडून येतील, असा विश्वास सर्व सदस्यांनी दिला असल्याचे दानवे यांनी सांगितले. लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाच्या ग्रामीण व शहर या दोन्ही निवडणुका सोमवारी होणार आहेत. याबाबतीतही दानवे यांनी पदाधिकाऱ्यांची चर्चा केली.

नुकताच लातूर महानगरपालिकेत भाजपला फटका बसला. लातूर महानगरपालिका पूर्वी भाजपच्या ताब्यात असताना काँग्रेसने भाजपचे काही नगरसेवक फोडून सत्ता काबीज केलेली आहे. या पाश्र्वभूमीवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे येथे येण्याला एकप्रकारेच महत्त्व प्राप्त झाले आहे. लातूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असून पुन्हा महानगरपालिकेसारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी संपूर्ण भाजपचे पदाधिकारी खबरदारी घेत आहेत. राज्यात आता शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाआघाडीचे सरकार असून लातूरला अमित देशमुख यांच्या रुपाने कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.

सांस्कृतिक आणि वैद्यकीय शिक्षण विभागासारखे महत्त्वाचे खाते अमित देशमुख यांना मिळालेले आहे. त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेत फोडाफोडीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी दानवे हे रविवारीच येथे दाखल झालेले आहेत.

औरंगाबाद शिवसेनेत फूट

औरंगाबाद जिल्हा परिषदेत भाजपचे एल. जी. गायकवाड हे उपाध्यक्ष झाले आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची मते फुटली असल्याकडेही मंत्री दानवे यांनी लक्ष वेधले.