गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अशा भामरागड तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यात पुरामुळे अनेक घरांचे, शेतीचे तसेच भामरागड शहरातील व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. याबाबत पालकमंत्री तसेच नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी भामरागड या ठिकाणी जाऊन त्याबाबत पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित बाधितांना पुनर्वसनासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया राबविण्यात येईल असे आश्वासन दिले. भामरागड तहसील कार्यालयात पुरामुळे बाधित झालेल्या १२० गावांमधील १००हून अधिक नागरिकांना ब्लॅंकेट व जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी भामरागड तालुक्यातील सर्व ८४०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य कीट व प्रत्येकाला एकेक ब्लॅंकेट मदत म्हणून दिले. याबाबत उर्वरित साहित्य वाटप येत्या काळात करण्यात येणार आहे.

“प्रशासन भामरागडबाबत अतिशय संवेदनशील असून आवश्यक उपाय योजना तातडीने राबवित येणार आहेत. तालुकावासीयांच्या पाठीशी पालकमंत्री म्हणून मी सदैव असणार आहे”, असा दिलासा त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्याधिकारी सुरज जाधव यांनी भामरागड पूरस्थिती बाबत सादरीकरणाद्वारे पालकमंत्र्यांना माहिती दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी पूरस्थितीबाबत पूरग्रस्तांशी संवाद साधला व आवश्यक मदतीबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. यामध्ये पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे, घरांचे व इतर ठिकाणचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याचे प्रशासनाला निर्देश दिले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या दुःखद निधनामुळे आयोजित कार्यक्रमांमध्ये स्वागत व सत्कार न स्वीकारता त्यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पर्लकोटा नदीवरील पूलाला भेट देऊन पाहणी केली व त्या ठिकाणी नव्याने पूल होणार आहे, त्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावेळी त्यांनी भामरागड मधील दरवेळेस पुराच्या पाण्यात जाणाऱ्या घरांना व व्यापारी वर्गाला नवीन ठिकाणी पुनर्वसनासाठी आवश्यक मदत जिल्हा नियोजन मधून नगर विकास खात्यांतर्गत देण्यासाठी तातडीने प्रयत्न करू असे सांगितले.

कार्यक्रमात करोनाबाबत बचाव करण्यासाठी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. मास्क वापरा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा असे ते म्हणाले. अजून एक ते दोन महिने आपणाला या कोरोनाशी लढा द्यावयाचा आहे. सावधानता बाळगणं बंद करू नका. आवश्यक काळजी घेणे आपले कर्तव्य आहे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

वडसा व सावंगी येथील पूरस्थितीची केली पाहणी

पालकमंत्री शिंदे यांनी देसाईगंज वडसा येथील पूरग्रस्तांना व सावंगी येथील बाधितांना भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली. सावंगी येथील तसेच देसाईगंज शहराजवळील पुरामुळे झालेल्या नुकसानाचेही पंचनामे तातडीने करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या. सावंगी येथील भात आणि तूर शेतीचे झालेल्या नुकासानाची पाहणी केली. पालकमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आवश्यक भरपाई वेळेत मिळेल, असा दिलासा दिला. या भेटीत हनुमान वार्ड वडसा येथे त्यांनी २५० पुरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे कीट वाटप करण्यात आले. तसेच सावंगी येथील पूरस्थितीमुळे बाधितांनाही २५० कीटचे वाटप केले.