केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावर आणि राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्या निवडीवर भाजपानं प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली आहे. या टिकेला राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पद्म पुरस्कारांच्या शिफारस समितीवर आदित्य ठाकरेंची निवड योग्यच , तरूण आणि प्रतिभा असलेल्या नेतृत्वावर विश्वास टाकायलाच हवा. तसेच टीका करणार्‍यावर लक्ष देण्याची गरज नाही, असं वक्तव्य सामंत यांनी केलं आहे. उद्य सामंत यांची आज पुण्यात पत्रकार परिषद झाली.यावेळी ते बोलत होते.

तरूण आणि प्रतिभा असलेल्या नेतृत्वावर विश्वास टाकायलाच हवा. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची पद्म पुरस्कारांच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. टीका करणार्‍यावर लक्ष देण्याची गरज नाही असे उदय सामंत म्हणाले. यावेळी बोलताना सांमत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचंही सांगितलं, तसेच बारावीनंतर घेण्यात येणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा विचार सुरु असल्याचंही ते म्हणाले.

करोना परिस्थिती लक्षात घेता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या आहे. त्यावर उद्या न्यायालयात तारीख असल्याने आज मी त्या विभागाचा प्रमुख असून त्यावर मी बोलणे उचित ठरणार नाही.जो विचार पूर्वी केला होता. तोच विचार आत्ता करीत आहे. करोना परिस्थिती पाहता परीक्षा घेता येणार नाही आणि हेच प्रतिज्ञापत्र आम्ही कोर्टात दिले आहे. सीईटी ही स्वायत्त संस्था असून त्यांना वैयक्तिक अधिकार आहे. त्याच बरोबर आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन बारावीसाठी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा विचार करत आहे. याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सामंत म्हणाले.