राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी चक्क पिस्तूल कमरेला खोचून मूकबधिर विद्यार्थ्यांसमोर भाषण केले. जळगावमध्ये मूकबधिर मुलांना साहित्यवाटपाचा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते उपस्थित होते.
आमदाराला किंवा मंत्र्याला सरकारतर्फे सुरक्षा देण्यात येते. गिरीश महाजन यांनादेखील संरक्षण आहे. मात्र त्यांनी मूकबधिर मुलांच्या कार्यक्रमात पिस्तूल लावून उपस्थित राहिल्याने तो चर्चेचा विषय झाला होता. विशेष म्हणजे मूकबधिर विद्यार्थ्यांसमोर आपण बोलत आहोत, याचे भानही महाजन यांनी ठेवले नाही. महाजन यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. या वेळी गिरीश महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सुपेकर व्यासपीठावर होते.
दरम्यान, स्वसंरक्षणार्थ पिस्तूल ठेवल्याची सारवासारव महाजन यांनी केली आहे. शस्त्रांचे प्रदर्शन करून आपण मुलांसमोर कोणते उदाहरण ठेवतो याचा विचार मंत्र्यांनी करायला हवा होता,  अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.