नवीन पाणीपुरवठा योजनांची आखणी करण्याचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे  निर्देश

पालघर : जिल्ह्यतील एकूण ८२ गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची आखणी करून तातडीने त्या कामांना गती द्यावी, अशी आदेशवजा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यतील या गावांना पाणी दिलासा मिळणार आहे.

बाडा पोफरण, धाकटी डहाणू परिसरातील ३० गावे, केळवे माहीम परिसरातील २० गावे उंबरपाडा आणि नंदाडे परिसरातील ३२ गावे अशा योजना तातडीने मार्गी लागव्यात यासाठी कामे सुरू करा, असे पाटील यांनी सूचित केले. मंगळवारी याबाबत पालघरचे खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे गटनेते जयेंद्र दुबळा, राजेश शहा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांनी पाणी प्रश्नावरून आढावा घेतला होता. त्यानुसार महत्त्वाच्या  योजनांसंदर्भात बैठक झाली.

बाडा पोफरण  २९ गावे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अनेक त्रुटी असल्याची बाब या वेळी मंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. त्यानंतर देखभाल व दुरुस्तीसाठी ही योजना पालघरच्या जिल्हा परिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी, असे निर्देश पाटील यांनी दिले. धाकटी डहाणू गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी चंडी गावापासून स्वतंत्र ंवा डहाणू नगरपालिकेच्या जलवाहिनीतून  यापैकी एका पर्यायाची निवड करून त्याचा जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट करावा, असे स्पष्ट करण्यात आले.

ठराव असे..

* नवीन जलजीवन मिशनच्या धोरणानुसार केळवेमाहीम प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अंदाजपत्रक आणि आराखडे दरडोई ५५ लिटरप्रमाणे तयार करून एक महिन्याच्या आत प्रस्ताव सादर करावा.

* पालघर जिल्ह्यतील उंबरपाडा नंदाडे आणि १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी

* केळवे धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे खडकोली बंधाऱ्यातून जल जीवन मिशनमध्ये नवीन योजनेची आखणी करून प्रस्ताव

* मोखाडा तालुक्यातील चास आणि गोमघर पाणीपुरवठा योजनेची कामे बंद आहेत. ती त्वरित सुरू करण्याचे निर्देश.