जससंपदा  मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू कारखाना कार्यालयास रविवारी मध्यरात्री संशयास्पदरीत्या आग लागली. एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू असताना  ही घटना घडल्याने ही आग लावली असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चार दिवसापूर्वी क्रांती कारखान्याचे कार्यालय पेटविण्यात आले होते. त्यानंतर जिल्हयात हा दुसरा प्रकार आहे. मात्र, या प्रकारणी कोणीही तक्रार दाखल केली नाही तसेच या घटनेचीही कुणा संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली  नाही.

राजारामबापू साखर कारखान्याच्या मिरज तालुक्यातील सावळवाडी (कारंदवाडी गट नंबर ७) येथील कार्यालयास आग लावण्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. या आगीत कार्यालयात असलेल्या कागदपत्रे आणि फर्निचरचे नुकसान झाले असून ही घटना उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते.  स्वाभिमानीनेही या प्रकाराची  जबाबदारी अद्याप घेतलेली नाही. मात्र एकरकमी ‘एफआरपी’साठी संघटनेचे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरूच राहील असेही सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनास्थळापासून जवळच असलेल्या दुधगाव येथे रविवारी रात्री स्वाभिमानीचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांची सभा झाली होती. या सभेत शेट्टी यांनी एकरकमी ‘एफआरपी’च्या मागणीवर संघटना ठाम असून यासाठी कोणालाही शिंगावर घेण्याची आमची तयारी असल्याचा इशारा दिला होता. यानंतरच ही आग लागल्याने त्याकडे संशयाने पाहिले जात आहे.

एकरकमी ‘एफआरपी’ देण्याचे कारखाना प्रतिनिधींनी संयुक्त बैठकीत मान्य करूनही सोनहिरा, उदगिर, निनाई-दालमिया आणि मोहनराव शिंदे आरग हे चार कारखाने वगळता अन्य कारखान्यांनी हप्त्याने उस देयके देण्यास सुरुवात केली आहे. पहिला हप्त्यापोटी प्रतिटन अडीच हजार रुपये उस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दोन दिवसापुर्वी ‘दत्त इंडिया’ संचालित वसंतदादा साखर कारखान्यावरही आंदोलनाचा प्रयत्न संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्या वेळी कारखाना व्यवस्थापनाने दहा दिवसात उर्वरित रक्कम उस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आश्वासन दिले.