‘धोरण आखणे हे सरकारचे काम आहे ते आम्ही करू. अंमलबजावणी करणे तुमचे काम आहे. तुम्ही फक्त अंमलबजावणी करा. कोणते धोरण चांगले व कोणते वाईट ते सांगू नका,’ या शब्दांत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्याशी पहिल्याच बठकीत संवाद साधला. मंत्री लोणीकर यांच्या या पवित्र्याने बठकीचा नूर अचानक पालटला. 

लोणीकर यांच्या परभणी दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम आयोजित केले होते. याच दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बठक घेतली. खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, मधुसूदन केंद्रे, विजय भांबळे व रामराव वडकुते, जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बठकीत पाणीपुरवठय़ाशी संबंधित विषयांची चर्चा झाली.
ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न भीषण आहे. अशा वेळी एकत्रित पाणीपुरवठा योजनांची यशस्वी अंमलबजावणी झाली पाहिजे. गुजरातेत जेथे मोठय़ा प्रमाणात अवर्षणग्रस्त गावे आहेत, तेथे अनेक गावांसाठी एकाच योजनेद्वारे नियमित पाणीपुरवठा होतो. गुजरातमध्ये या योजना यशस्वी झाल्याची माहिती बठकीत लोणीकर देत होते. त्याच वेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी या योजनेचे सादरीकरणही केले. हे सादरीकरण चालू असतानाच लोणीकर व जिल्हाधिकारी सिंह यांच्यातला हा ‘संवाद’ सुरू झाला.
या पद्धतीच्या योजना आपल्याकडे यशस्वी होत नाहीत. जेथे गावांचे ‘क्लब’ करून या योजना एकत्रित करण्यात आल्या, तेथे योजनांची अंमलबजावणी नीट होत नाही. कोणावरही जबाबदारी निश्चित करता येत नाही आणि पुढे अशा योजनांच्या देखभालीचाही प्रश्न निर्माण होतो. अशा एकत्रित योजनांपेक्षा गावनिहाय योजना जास्त परिणामकारक ठरल्या आहेत. अशा आशयाचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी सिंह यांनी दिले. त्यावरून लोणीकर यांच्यातले ‘सरकार’ जागे झाले. त्यांनी सिंह यांना थांबवत त्यांच्यावर सरबत्ती सुरू केली. ‘योजना कशा तयार करायच्या आणि धोरणे कशी आखायची ते सरकारचे काम आहे, ते तुमचे काम नाही. तुमचे काम फक्त अंमलबजावणी करायचे आहे,’ अशी जाणीव करुन देत तुम्ही फक्त तुमच्यापुरते पाहा, अशा आशयाचे उद्गार लोणीकर यांनी काढले. एवढे बोलूनही ते थांबले नाहीत तर त्यांनी आपले म्हणणे आणखी ठामपणे सांगण्याचा प्रयत्न केला. ऐन बठकीत हा सर्व प्रकार सुरू होता. लोणीकर यांच्या या पवित्र्याने बठकीचा रागरंगच बदलला.
मंत्री झाल्यानंतर लोणीकरांचा हा पहिलाच परभणी दौरा होता. आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे, अशी येथील लोकप्रतिनिधींचीही अपेक्षा होती. पण महायुतीमध्ये काही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे गेले. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होता आले नाही. पण मी तुमच्या जिल्ह्याचा लोकसभेचा मतदार आहे (लोणीकरांचा परतूर विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात येतो) तुमच्याजवळचा आणि तुमच्या कायम उशा-पायथ्याशी राहणारा माणूस, म्हणून मी नेहमीच तुमच्या जिल्ह्याचे प्रश्न सोडवीन, असे लोणीकर यांनी बठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.