बकरी ईद साजरी करण्याबाबत जी नियमावली जाहीर झाली आहे त्या नियमावलीत कुर्बानीवर बंदी घालण्यात आलेली नाही अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. वाहतुकीसंदर्भात जे काही गैरसमज होते तेदेखील आता दूर झाले आहेत असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बकरी ईद साजरी करण्याबाबत जे गैरसमज होते त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. लॉकडाउनमध्ये कुर्बानीवर बंदी घालण्यात आलेली नाही असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

नेमकं काय म्हणाले नवाब मलिक?
“बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. जे काही गैरसमज आहेत ते गृहमंत्री संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून दूर करतील. मुंबई शहरात बकरी आणण्यासाठी कोणतीही वाहतुकीची अडचण येणार नाही. बोकडाच्या वाहतुकीवरही बंदी असणार नाही. ज्यांनी बकरी ऑनलाइन बुक केली असेल त्यांनाही बकरी मिळेल”

बाळासाहेब थोरात यांनीही या संदर्भात भाष्य केलं आहे. सरकारने बकरी ईद संदर्भात काही सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीने बकरी ईद साजरी करण्यात येईल. नागरिकांनी नियमांची काळजी घेणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगल्यावर पोलिसांसाठी सिडकोच्या माध्यमातून चार हजार घरांसाठी अर्ज मागवण्यासाठीच्या योजनेचा ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नवाब मलिक आणि अनिल परब या सगळ्यांची उपस्थिती होती.