मराठा समाजाला मिळालेले १६ टक्के आरक्षण हे ओबीसी समाजावर अन्याय करणार नाही. हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना मराठा आरक्षणावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मराठा समाजाला देण्यात आलेले १६ टक्के आरक्षण हे ओबीसींवर अन्याय करणारे नाही. काही घटनातज्ञ सांगत आहेत की न्यायालयात आरक्षण टिकणार नाही. पण सरकारकडे असलेल्या दस्तावेजनुसार हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास खोत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महाराष्ट्रातील कळीचा मुद्दा बनलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात अखेर गुरुवारी राज्य सरकारला यश आले होते. मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकास विधिमंडळात मंजुरी मिळाली असून शनिवारी आरक्षणासंदर्भातील अधिसूचनाही जारी झाली आहे. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयात स्थगिती मिळू नये यासाठी राज्य सरकारने न्यायालयीन लढाईची व्यूहनीती आखली असून आरक्षणाची अधिसूचना काढतानाच न्यायालयात कॅव्हेट दाखल करून स्थगिती टाळण्याची योजना आखण्यात आली आहे.