कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा प्रश्न

सांगली : समाजमाध्यमात रस्त्यातील खड्डय़ांचे फोटो देऊन प्रसिद्धीचा स्टंट करणाऱ्यांनी १५ वष्रे सत्ता हाती असताना काँग्रेस आघाडीने काय केले, असा सवाल कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. सध्या सत्ताहीन झालेल्यांना काही कामच उरले नसल्याने प्रसिद्धीचा स्टंट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

सांगलीवाडी ते तुंग या रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा खोत यांच्या हस्ते मंगळवारी प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, नगरसेवक शेखर इनामदार, अजिंक्य पाटील, पृथ्वीराज पवार, सचिन डांगे, महादेव नलवडे, भीमराव माने, प्रकाश कोळी, विलास डांगे, सागर खोत, वैभव िशदे  आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री खोत म्हणाले, केवळ सेल्फी काढून रस्ते होत नसतात. यांच्या पंधरा वर्षांच्या कारकीर्दीत या रस्त्याची काय अवस्था होती ते सर्वाना माहीत आहे.

त्या वेळी  रस्ते चांगले झाले असते तर ते एका वर्षांत उखडले नसते. सुरुवातीपासूनच हा रस्ता दर्जाबाबत गाजतो आहे. रस्ता लगेच खराब का झाला त्याची चौकशी व्हायला हवी.  मात्र त्या वेळी झाली नाही.

ते म्हणाले, पंधरा वर्षांत रस्त्यासाठी जेवढे पसे आले नाहीत तेवढा निधी ना. नितीन गडकरी यांनी राज्यातील रस्त्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. मुख्यमंत्री, महसूलमंत्री, आमदार सुधीर गाडगीळ यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले. सेल्फी काढून रस्ते होत असतील तर स्टंटबाजी करणाऱ्यांनी शाहुवाडीत, कोकणात जावे. त्यामुळे त्या भागातील रस्ते होतील.

आमचे सरकार हे काम करणारे आहे. आम्ही विकासात्मक दृष्टिकोन डोळय़ांसमोर ठेवून काम करीत आहोत. म्हणूनच परिसरातील अनेक पाणीपुरवठा योजनांना आणि रस्त्यांना मान्यता दिली आहे. मोठय़ा प्रमाणात विकासकामे होत आहेत असेही त्यांनी सांगितले.