दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत न मिळालेल्या तालुक्यांच्या तहसीलदारांवर कारवाई करणार असल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी येथे बोलताना स्पष्ट केले. शिवसेनेचे संपर्कनेते रवींद्र मिर्लेकर यांनी जिंतूर तालुक्यात दुष्काळी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून राठोड यांना निवेदन दिले.
जिंतूर विधानसभा मतदारसंघातील पाच जिल्हा परिषद सर्कलच्या अनेक गावांमध्ये राठोड यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह भेट दिली. या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. सरकारने दुष्काळी मदत जाहीर केली. परंतु अजूनही आमच्यापर्यंत ही मदत पोहोचली नाही. सध्या पिण्यास पाणी नाही. जनावरांना चारा नाही अशा अडचणी शेतकऱ्यांनी मिर्लेकर यांच्यासमोर मांडल्या. सरकारची दुष्काळी मदत अजूनही शेतकऱ्यांना न मिळाल्याने मिर्लेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच सकाळी मंत्री राठोड यांची सावली विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन दिले.
राठोड यांनी निवेदनाची त्वरित दखल घेत जिंतूरच्या तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. २४ तासांत शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास संबंधित तहसीलदाराविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ज्या गावात सरकारची मदत गेली नाही तेथे मंडल अधिकाऱ्यांचे पथक त्वरित पाठवा व शेतकऱ्यांना सरकारची मदत द्या, अशा सूचना त्यांनी केल्या. संपर्क नेते मिर्लेकरांसह आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख संजय कच्छवे, उपजिल्हाप्रमुख माणिक पेंढे, तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले, रणजित गजमल आदींसह पदाधिकारी, शिवसनिकांच्या या निवेदनावर सहय़ा आहेत.