एकेरी मार्गावरून जाण्यास मनाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह चालक व दोन कार्यकर्त्यांना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने ३ महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

मारहाणीची ही घटना २४ मार्च २०१२ रोजी दुपारी  राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी परिसरात घडली होती.  याप्रकरणी शहर वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचारी उल्हास रौराळे यांनी तक्रार दिली होती. घटनेच्या दिवशी तत्कालीन काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर या आपल्या वाहनाने काही कार्यकर्त्यांसह चुनाभट्टी ते गांधी चौक या एकेरी मार्गाने जात होत्या. त्यावेळी वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी त्यांचे वाहन अडवले. हा एकेरी मार्ग असल्याचे सांगून त्यांनी वाहन घेऊन जाण्यास मनाई केली. त्यावर यशोमती ठाकूर यांच्यासह चालक सागर, कार्यकर्ते शरद व राजू यांनी वाहनाखाली उतरून उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घातला आणि  मारहाण केली, अशी तक्रार उल्हास रौराळे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशीअंती न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणात न्यायालयाने ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यातील १ साक्षीदार फितूर झाला. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून न्यायालयाने यशोमती ठाकूर, सागर खांडेकर, शरद जवंजाळ व राजू इंगळे यांना ३ महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. त्याचवेळी फितूर झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले.

न्यायालयाच्या निकालाचा

आम्ही सन्मान करतो. पण, आम्ही निर्दोष आहोत. या प्रकरणाला विविध कंगोरे आहेत. या निकालाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास आहे.

– यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री