राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे रविवारी खासगी दौऱ्यानिमित्त नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आनंदवली येथील नवश्या गणपती मंदिरात हजेरी लावून आरती केली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये मंत्री आव्हाड यांना वगळता मंदिरात उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरुन भाजपाने मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.

भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी याप्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना वेगळा न्याय का असे म्हटले आहे.

“याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना वेगळा आणि सर्व सामान्य नागरिकांना वेगळा कायदा असतो का असा प्रश्न तुषार भोसले यांनी केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे. गुन्हा दाखल न केल्यास धरणे आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही आचार्य तुशार भोसले यांनी दिला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत. असं असताना दुसरीकडे राज्याच्या मंत्र्यांनीच चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आरती केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहे तर दुसरीकडे याच निर्बंधांचं सरसकट उल्लंघन, राज्य सरकार मधील जबाबदार मंत्रीच करताय असा सवाल भाविकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान यानंतर नाशिक पोलिसांनी मंत्री आव्हाड यांना वगळता ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मंत्र्यांना आणि सामान्य जनतेला वेगळा न्याय आहे का असा सवाल केला जात आहे. यावरुन भाजपाने जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.