नियंत्रणासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती; ‘लोकसत्ता’च्या बातमीचा परिणाम

नीलेश पवार, नंदुरबार

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या ‘सेंट्रल किचन’ व्यवस्थेतून पुरविण्यात येणाऱ्या दूधपुरवठय़ातील गोंधळ ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी सेंट्रल किचनमधील दुधासह इतर अन्न तपासणीचे आदेश विभागाला दिले आहेत. प्रसंगी संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. प्रकल्पाधिकारी जितेंद्र डोडी यांनीही गुरुवारी येथील सेंट्रल किचनची तपासणी केली. आदिवासी विकास विभागाने साहाय्यक प्रकल्प अधिकारी दर्जाचे प्रदीप देसाई यांची सेंट्रल किचनवर नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

सेंट्रल किचनमधून उत्पादनाची तारीख आणि मालाचा वापर करण्याची अंतिम मुदत दिलेली नसलेले धोकादायक दूध वितरित झाल्याची बातमी ‘लोकसत्ता’ने दिल्यानंतर नंदुरबार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय गाजला. कोटय़वधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सेंट्रल किचन व्यवस्थेतून अशा पद्धतीने जर धोकादायक अन्नपदार्थ वितरित होत असतील तर या पद्धतीचा काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर यावर तात्काळ कारवाईचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. यानंतर पत्रकारांना त्यांनी या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना संबंधित नमुने तपासणीचे आदेश दिल्याचे सांगितले. वेळप्रसंगी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

या घडामोडीनंतर नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र डोडी यांनी सेंट्रल किचनमधील सर्व गोष्टींची तपासणी केली. त्यांनी अमूलच्या दुधाची चव घेत संबंधित स्त्रीशक्ती संस्थेला तंबी दिली. यापुढे अमूल वगळता विद्यार्थ्यांना इतर कंपनीचे दूध वितरित झाल्यास आदिवासी विकास विभाग आपल्यावर गुन्हे दाखल करील, असा इशारा दिला. मुळात या ठिकाणी शासनाने सुमारे ५० लाख रुपये खर्च करून अन्न तपासणी प्रयोगशाळादेखील उभारली आहे. ती कार्यान्वित करण्याच्या सूचना देत यातील तपासणी करण्यात आलेल्या अन्नपदार्थाचा रोजचा अहवाल आपल्या कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही डोडी यांनी स्त्रीशक्ती संस्थेला दिले.

सेंट्रल किचन व्यवस्था सुरू झाल्यानंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या जेवणाची मोठी समस्या दूर झाली. या ठिकाणच्या जेवणाबाबत समाधानही व्यक्त केले जात असताना दूध वितरणातील गोंधळ उजेडात आला. आता आदिवासी विकास विभागाने साहाय्यक प्रकल्प अधिकारी दर्जाचे प्रदीप देसाई यांची सेंट्रल किचनवर नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.