राज्यातील आघाडी सरकारच्या कारभारावर जनता नाराज असली तरी या सरकारमधील तब्बल १९ मंत्री स्वत:ची प्रतिमा उजळून घेण्यासाठी दक्ष आहेत. या मंत्र्यांनी माहिती व जनसंपर्क खात्यातील अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर घेतल्याने या खात्यात सध्या अधिकाऱ्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.
राज्यात गेल्या १५ वर्षांंपासून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार सत्तेत आहे. यात सरकारच्या कारभारावर जनता नाराज असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. सरकारच्या कामकाजावर जनता नाराज असली तरी या सरकारमधील मंत्री मात्र स्वत:च्या प्रसिद्धीच्या बाबतीत कमालीचे दक्ष आहेत. त्यांनी माहिती व जनसंपर्क खात्यातील जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना स्वत:च्या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर घेतले आहे. मंत्र्यांना जनसंपर्क अधिकारी नेमण्याचा अधिकार असला तरी यासंदर्भातील नियम वेगळे आहेत. मंत्र्यांच्या कामाला प्रसिद्धी मिळावी म्हणून तीन मंत्र्यांच्या मागे एक विभागीय संपर्क अधिकारी नेमण्याचा निर्णय अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना घेण्यात आला होता. या विभागीय संपर्क अधिकाऱ्याने तीनही मंत्र्यांच्या प्रसिद्धीचे कामकाज सांभाळावे, असे तेव्हा ठरवण्यात आले. या निर्णयाला बगल देऊन राज्यातील १९ मंत्र्यांनी प्रत्येकी एक, याप्रमाणे १९ जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर घेतले आहे.
एकाच वेळी एवढे अधिकारी खात्यातून निघून गेल्याने नियमित कामकाज सांभाळताना माहिती व जनसंपर्क संचालनालयाची तारांबळ उडत आहे.  याशिवाय, या खात्यात माहिती अधिकाऱ्यांची दहा पदे रिक्त आहेत. अधिकारीच नसल्याने आता ऐन निवडणुकीच्या काळात जनसंपर्क खात्यावर कमालीचा ताण पडत असून कामकाजही विस्कळीत झाले आहे.
२९ अधिकाऱ्यांचा तुटवडा
अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची पदे रिक्त ठेवावी लागत आहेत. याशिवाय, या खात्यात जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची दहा पदे रिक्त आहेत. प्रतिनियुक्ती आणि ही रिक्त पदे लक्षात घेतली तर या खात्याला तब्बल २९ अधिकाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे.