सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यास केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आता केवळ नागरी विमान वाहतूक विभागाच्या सरसंचालकांकडून परवानगी मिळणे अपेक्षित आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर लगेचच ही विमानसेवा सुरू होणे शक्य आहे. सोलापूरबरोबर कोल्हापूरसाठीदेखील विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी २००८ साली सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख पुढाकाराने किंग फिशर कंपनीमार्फत मुंबई विमानसेवा सुरू झाली होती. या विमानसेवेला सोलापूरकरांचा उत्तम प्रतिसाद लाभत असताना पुढे अचानकपणे या विमानसेवेला खीळ बसली. त्यानंतर पुन्हा विमानसेवा सुरू होण्याची मागणी स्थानिक उद्योजक व व्यापाऱ्यांनी लावून धरली असताना माढय़ाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा दुसऱ्यांदा पुढाकार घेतला. त्यानुसार मुंबईची सुप्रीम एव्हिएशन प्रा. लि. कंपनी विमानसेवा देण्यास तयार झाली आहे. सोलापूरबरोबर कोल्हापूर येथेही विमानसेवा सुरू करण्याची कंपनीने तयारी केली आहे. त्यासाठी दोन छोटी विमाने उपलब्ध करून बंगळुरू येथे सज्ज ठेवण्यात आली आहेत. येत्या १५ ऑगस्टपासून किंवा त्या आसपास कधीही विमानसेवा सुरू होऊ शकते, असे खासदार मोहिते-पाटील यांनी म्हटले होते.
विमानसेवा सुरू होण्यासाठी त्याच्या मार्गाला मान्यता मिळणे व नागरी हवाई वाहतूक विभागाच्या सरसंचालकांची परवानगी मिळणे महत्त्वाचे असते. त्यानुसार नागरी उड्डाण मंत्रालयाने सोलापूर-मुंबई-सोलापूर विमान वाहतूक मार्गाला मान्यता दिली आहे. यासंदर्भात खासदार मोहिते-पाटील यांनी नवी दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री गजपती राजू यांची भेट घेतली. त्यावर राजू यांनी सोलापूरच्या विमानसेवेला हिरवा कंदील दाखविला. या वृत्ताला सुप्रीम एव्हिएशन कंपनीचे अध्यक्ष अमित अग्रवाल यांनी दुजोरा दिला आहे. आता केवळ नागरी हवाई वाहतूक विभागाच्या सरसंचालकांकडून परवानगी मिळण्याची औपचारिकता शिल्लक आहे. ती पूर्ण झाल्यानंतर येत्या १५ ऑगस्ट रोजी किंवा त्यानंतर कधीही विमानसेवा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.