कोराडी भागात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर मध्यप्रदेशातील मुलताई येथे अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

आकाश अशोक कापसे व नंदकिशोर पगारे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आकाश हा चौकीदार असून, पीडित मुलगी नवव्या वर्गात शिकते. काही दिवसांपूर्वी दोघांनी मुलीचे अपहरण केले. तिला मुलताई येथे नेले. आकाश याने तिचा विनयभंग केला तर नंदकिशोर याने तिच्यावर अत्याचार केला. मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी कोराडी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला.

मोबाईल कॉल डिटेल्स तपासले असता आकाश मुलीसोबत सतत संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आकाशच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन शोधले. तो मुलताई येथे असल्याचे स्पष्ट झाले. कोराडी पोलिसांचे पथक मुलताईला गेले. पोलिसांनी मुलीची सुटका करून आकाश व नंदकिशोर या दोघांना अटक केली. आकाशने विनयभंग तर नंदकिशोर याने अत्याचार केल्याचे मुलीने पोलिसांनी सांगितले.