भागीदारीतील व्यवसायात आलेल्या वितुष्टातून शिवानी मोहन गजबे या चार वर्षीय मुलीचे अपहरण भागीदार कबिंद्र उर्फ कबीर लाजपतसिंग ठाकूर (२३) व अमित दिलीप थापा (२०) या उत्तरप्रदेश व मणिपूर येथील युवकांनी आठ लाखाच्या खंडणीसाठी केली. या दोन्ही अपहरणकर्त्यांना अवघ्या १२ तासात रायपूर येथे बुधवारी मध्यरात्री अटक करण्यात आली असून बालिका सुखरूप असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या शिवानीचे बुधवारी सकाळी ११ वाजता शाळा परिसरातून अपहरण करण्यात आले होते. हे कळताच शिवानीची आई व वडील मोहन गजबे हादरले. दरम्यान, काही वेळातच अपहरणकर्त्यांने मुलगी सुखरूप हवी असेल तर आठ लाखांची खंडणी गुरुवारी १२ वाजेपर्यंत द्या. पोलिसांकडे तक्रार केली किंवा पैसे दिले नाही, तर मुलीला ठार करू, अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या मोहन गजबे यांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार १२.५० मिनिटांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली. लगेच ब्रह्मपुरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधु, पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, नागभीडचे सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली चार पथके गठीत करून अतिशय वेगाने तपासाची चक्रे फिरवली. शाळेच्या शिक्षिका व परिसरात चौकशी केली असता कबिंद्र ठाकूरनेच शिवानीला शाळेतून एका ऑटोत बसवून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे प्रथमत: अपहरणकर्त्यां ज्या मोबाइलवरून बोलला तो तपासला असता तो वडस्याहून आल्याचे कळले. त्या आधारावर गजबे यांचा व्यावसायिक भागीदार कबिंद्र उर्फ कबीर लाजपतसिंग ठाकरे व अमित दिलीप थापा यांनी अपहरण केले, हे निश्चित झाले.
ब्रह्मपुरी पोलिसांनी एक पथक वडसा येथे पाठवून कबिंद्रला ताब्यात घेतले. त्याला बोलते केल्यावर शिवानीचे अपहरण आपणच केले असून अमितच्या माध्यमातून शिवानी हिला चांदा फोर्ट रेल्वेद्वारे गोंदिया येथे पाठविले आहे. गोंदिया येथून अमित शिवानीला रायपूरच्या दिशेने निघाला असल्याची माहिती दिली. हे कळताच तातडीने एक पोलीस पथक रायपूर येथे पाठवले. हे पथक मध्यरात्री तेथे पोहोचले यावेळी अमित गीतांजली एक्स्प्रेसने उत्तर प्रदेशकडे जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला मुलीसह ताब्यात घेतले. यानंतर पथकाने छत्तीसगड येथून आज पहाटे आरोपीसह शिवानीला ब्रह्मपुरीत आणले. मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला आईवडिलांकडे सोपवल्यावर शिवानी आईला रडत रडतच बिलगली.
व्यवसायातील वितुष्टातूनच अपहरण केल्याचे कबिंद्र याने पोलिसांना सांगितले. मोहन गजबे यांचे निसर्ग उपचार केंद्र असून २००२ ते २०१२ पर्यंत दिल्लीतील सुर्या फाऊंडेशनमध्ये काम करताना कब्रिंद्रशी त्यांची ओळख झाली. उत्तरप्रदेशातील रायपूर जिल्ह्यातील ढकिया येथील रहिवासी असलेल्या कबिंद्र व मोहन यांच्यात चांगलीच मैत्री झाली. यानंतर त्यांनी ब्रह्मपुरीत भागीदारीत निसर्ग उपचार केंद्र सुरू केले. कबिंद्र मोहन गजबे यांच्या घरीच राहात होता. शिवानीला आईवडिलांशिवाय कबिंद्र शाळेत सोडायचा. निसर्ग उपचार केंद्र चालवित असताना गजबे व ठाकूर यांनी गुंतवणूक करायचे ठरविले. त्यानुसार कबिंद्रने ६२ हजार रुपये गुंतवणूक केली, तसेच दोघांनी प्रत्येकी ५० हजार रुपये वैयक्तिक कर्ज ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेकडून घेतले. हा व्यवसाय भागीदारीत असतानाही कबिंद्रने स्वतंत्र उपचार करणे, तसेच मूल येथेही निसर्ग उपचार केंद्र सुरू केले. त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊ लागले. सहा महिन्यांपूर्वी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तेथून हे संबंध आणखीच बिघडले. त्यामुळे गुंतवणूक केलेले ६२ हजाराची रक्कम मिळावी म्हणून तो सतत फोन करायचा, तसेच मोहन गजबे, त्यांचे वडील व पत्नीला पैशाची मागणी करून वारंवार धमकी देत होता. अपहरणाच्या दहा-बारा दिवसापूर्वी कबिंद्र ठाकूर एका व्यक्तीसोबत ख्रिस्तानंद चौकात फिरताना दिसला. मात्र, तो अपहरण करेल असे वाटले नाही, पण शेवटी कबिंद्रने अपहरणाचा डाव रचला, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या अपहरणनाटय़ात अन्य काही जण सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.