एकीकडे सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओ असा नारा दिला जातो आहे. महिला सक्षमीकरणासाठी मोहीम उभी केली जाते आहे. अशात विद्येचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीला महाविद्यालयीन शिक्षण देतो असे सांगत तिचे लग्न वयाच्या १४ व्या वर्षी लावण्यात आले. त्यानंतर तिचा मानसिक आणि शारिरीक छळ झाल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. या मुलीच्या गरीबीचा फायदा उचलून तिच्या आजी आजोबांना फसवण्यात आलं. या प्रकरणी डॉक्टर अद्वैत अडबे यांनी फिर्याद दिली आणि त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीचे आई वडील मनोरूग्ण आहेत. त्यामुळे ही मुलगी आणि तिची बहिण लहानपणापासून तिच्या आजी आजोबांकडे रहात होत्या. २०१४ मध्ये लक्ष्मण (बदललेले नाव) याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी पीडित मुलीच्या आजी आजोबांची भेट घेतली. त्यानंतर लक्ष्मण आणि १४ वर्षांच्या मुलीचा विवाह झाला. विवाहानंतर मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत लक्ष्मण हा तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवणार नाही. तसेच या मुलीला महाविद्यालयीन शिक्षण दिले जाईल असे आश्वासन आजी आजोबांना लक्ष्मणच्या घरातल्यांनी दिले. या आजी-आजोबांनी विश्वास ठेवून संमती दिली.

२८ मे २०१४ रोजी या लक्ष्मण (बदललेले नाव) आणि अल्पवयीन मुलीचा विवाह झाला. विवाहानंतर हे दोघेजण काही दिवस लातूर जिल्ह्यात रहात होते. त्यानंतर हे दोघे पुण्यातल्या बिबवेवाडी भागात आले. या ठिकाणी सासू, सासरे, दीर, जाऊ असे सगळे वास्तव्यास होते. सुरूवातीला हे सगळे तिच्याशी चांगले वागले. मात्र मुलीने शिक्षणासंबंधी विचारणा करताच तिला उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधी तिच्या पतीने तिच्याशी शारिरीक संबंधही ठेवले. ज्यावेळी ही मुलगी नकार देत असे तेव्हा पती तिला पट्ट्याने मारहाण करत असे असेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी सासरच्या व्यक्तींविरोधात बाल लैंगिक अत्याचार, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम आणि विवाह प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा पुण्यतील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.