वाळव्यातील लैंगिक अत्याचार प्रकरण

वाळवा तालुक्यातील कुरळपच्या मीनाई आश्रमशाळेतील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आश्रमशाळेतील १४ शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून, आश्रमशाळेतील काही मुलींना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. तसेच गेल्या तीन वर्षांमध्ये आश्रमशाळेस भेट देऊन सर्व काही आलबेल असल्याचे शेरे लिहिण्यात आलेली नोंदवही ताब्यात घेण्यात आली आहे.

आश्रमशाळेतील अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण संचलनालय पुण्याच्या उपसंचालिका जयश्री सोनकवडे-जाधव,  समाजकल्याण अधिकारी भाते यांच्यासह समाजकल्याण सांगलीचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी सलग दोन दिवस भेट दिली. अत्याचार पीडित मुलींची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला. तसेच आश्रमशाळेत भेट देऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.

चर्चेमधून आश्रमशाळेतील १४ शिक्षक प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे सोनकवडे-जाधव यांनी सांगितले. दरम्यान, या चौकशीवेळी शिक्षकांनी आपणास बंदुकीचा धाक दाखवून, प्रसंगी अटकेतील महिला कर्मचाऱ्यांकडून अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दबाव आणला असल्याचे सांगितले. तर या वेळी एका महिला शिक्षक विचारपूस सुरू असतानाच चक्कर येऊन कोसळली. यामुळे चौकशी पथकाची तारांबळ उडाली. समाजकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने मुलींशीही संवाद साधून धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच गेल्या तीन वर्षांमध्ये समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन कामकाज चांगले चालल्याचे शेरे लिहिलेले शेरेबुकही ताब्यात घेण्यात आले आहे. या शेरेबुकमध्ये नोंदी करणारे अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. तपासणी अधिकाऱ्यांनी शेरेबुकमध्ये विद्याíथनींची वैद्यकीय तपासणी केली असल्याचे आणि सर्व काही आलबेल असल्याच्या नोंदी शेरेबुकमध्ये केल्या आहेत. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. स्वरदा केळकर यांनीही शुक्रवारी आश्रमशाळेस भेट दिली. आश्रमशाळेत अनुचित प्रकाराबद्दल केळकर यांनी सहायक आयुक्त सचिन कवले यांना नोटीस काढून खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाच्या वतीने अधीक्षक व संस्थेला नोटिसाही बजावल्या. या प्रकरणातील  दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.