24 April 2019

News Flash

अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शेतात बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघ्घी धावळी येथे घडली.

(संग्रहित छायाचित्र)

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शेतात बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघ्घी धावळी येथे घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रूपेश रूपलाल जावरकर (१९, रा. दिघ्घी धावळी) असे आरोपीचे नाव आहे. रूपेश गेल्या २ वर्षांपासून गावातीलच एका १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. गेल्या शनिवारी दुपारी ३ वाजता ही मुलगी मैत्रिणीकडे जात होती. यावेळी रूपेशने तिला रस्त्यात अडवले. तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून रूपेशने तिचा हात पकडला. जबरीने दुचाकीवर बसवून रूपेशने तिचे अपहरण केले. त्यानंतर रूपेशने तिला आपल्या बहिणीच्या शेतात नेले. येथे एका झोपडीत त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. रूपेशच्या तावडीतून कशीबशी सुटका करून पीडितेने धारणी पोलीस ठाणे गाठले. तिने रूपेशविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी रूपेशविरुद्ध अपहरण, बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

लग्नाचे आमिष देऊन अत्याचार

लग्नाचा शब्द देऊ न एका घटस्फोटित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुननगर येथे उघडकीस आली. सुनील महादेव पाठक (४५, रा.महेंद्र कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. काही महिन्यापूर्वी सुनीलची ओळख अर्जुननगर येथे राहणाऱ्या एका ४० वर्षीय घटस्फोटित महिलेशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर ते दोघे अर्जुननगर परिसरात एकत्र राहू लागले. सुनीलने महिलेवर अनेकवेळा बलात्कार केला. ती दोन महिन्यांची गर्भवती असताना त्याने एका खासगी रुग्णालयात तिचा जबरीने गर्भपात केला. यानंतर महिलेने सुनीलकडे लग्नाची मागणी केली. परंतु, यावेळी सुनीलने महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडित महिलेने तक्रार दाखल केली. गाडगेनगर पोलिसांनी आरोपी सुनील पाठक याला अटक केली आहे.

First Published on November 9, 2018 12:29 am

Web Title: minor girl raped after kidnapping